कोकरुड : फत्तेसिंगराव नाईक तालुका दूध संघाने दुधाला योग्य भाव, वेळेत लाभांश देत शेतकरी, दूध उत्पादक, सभासद यांचे हित साधले असल्याची माहिती दूध संघाचे संचालक सुरेश आप्पा चिंचोलकर यांनी दिली. गवळेवाडी (ता. शिराळा) पैकी हाप्पेवाडी येथील कार्यक्रमात ते बोलत होते.
सुरेश चिंचोलकर म्हणाले, विश्वास उद्याेग समूहाचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांच्याकडे दूध संघाची जबाबदारी दिल्यापासून संघाने अल्पावधित पश्चिम महाराष्ट्रात वेगळा ब्रँड तयार केला आहे. सध्या संघाचे तालुक्यातून ६० हजार लिटरपेक्षा जास्त संकलन होत असून संघाचे प्रचिती दूध, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, मसाला दूध, दही, ताक, लस्सी, तूप, खवा, चक्का, पेढे आदी पदार्थांना मोठी मागणी होत आहे. गेल्यावर्षी संघाने म्हैस दुधास दोन रुपये दहा पैसे, तर गाईच्या दुधास ऐंशी पैसे लाभांश दिला आहे.
यावेळी विराज दूध संस्थेच्यावतीने, शेतकरी, दूध उत्पादक, सभासद यांना मान्यवरांच्याहस्ते प्रत्येकी पाव किलो श्रीखंड, आम्रखंड याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास गवळेवाडीचे लोकनियुक्त सरपंच बाबा गोळे, उपसरपंच दत्ता हाप्पे, युवानेते सुनील हाप्पे, बाबूराव पाटील, महेश देसाई, रघुनाथ बुरान, शिरीष हाप्पे, बाबूराव काब्दुले, काशिनाथ हाप्पे, सारंग हाप्पे आदी प्रमुख उपस्थित होते.