सांगली : सांगलीतील एका वीज ग्राहकाला शून्य रुपयाच्या वीज बिलात महावितरणकडून १० रुपयांचा दंड आणि विलंब आकार लावला होता. या प्रश्नावर माध्यमातून बातमी प्रसिध्द होताच सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘त्या’ वीज बिलात दुरुस्ती करुन दि. ४ जून २०१८ रोजी संबंधित वीज ग्राहकास बिलाची पावती पोहोच केली.तांत्रिक कारणांमुळे शून्य रुपयाच्या वीज बिलास १० रुपये दंड आणि विलंब आकार लागल्याचा खुलासा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
राहुल वारद हे महावितरणच्या विश्रामबाग (सांगली) उपविभागाचे वाणिज्य ग्राहक आहेत. मागील सहा महिन्यांपासून वारद त्यांचे बिल आगाऊ भरत आहेत. त्यामुळे त्यांना येणारे वीज बिल वजा रकमेचे येत होते. मे महिन्यात त्यांना ९९ युनिटच्या वीज वापरापोटी १२२२.२६ रुपये इतके वीजबिल आकारण्यात आले. परंतु वारद यांची १२२३.०८ रुपये रक्कम महावितरणकडे शिल्लक होती. त्यामुळे वीज देय रक्कम शून्य आली.चालू महिन्याचे वीजबिल व महावितरणकडे ग्राहकाची असलेली शिल्लक/आगाऊ रक्कम यात एक रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक असल्यामुळे देयक रक्कम शून्य आली आहे.दंडही झाला शून्यतांत्रिक चुकीमुळे त्याठिकाणी १० रुपये दाखविण्यात आली. त्याची दुरूस्ती सुधारित बिलामध्ये करण्यात आली असून, ग्राहकाला नव्याने सुपूर्द केलेल्या वीज बिलावर सर्व रकमा शून्य करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने यंत्रणेतही सुधारणा करण्यात आल्या आहेत, असे महावितरण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.