सांगली : वर्षअखेर आणि त्यामुळे होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेत तसेच युरोपमध्ये वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात रात्री अकरा ते सकाळी सहा कालावधीत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. राज्य शासनाने याबाबतचे आदेश दिले असले तरी जिल्हा प्रशासनाकडे याबाबतचे आदेश रात्री उशिरापर्यंत आलेले नव्हते.
युराेपमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्याशिवाय वर्षअखेर आणि नाताळमुळे नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत महापालिका क्षेत्रात रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू केली आहे. आज, मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र, याबाबतची नियमावली जिल्हा प्रशासनाकडे आली नव्हती. दरम्यान, याबाबतचे आदेश अद्याप प्राप्त नाहीत, तरीही राज्य शासनाच्या आदेशानुसार आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करू. सकाळपर्यंत आदेश आल्यानंतर नियोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी व पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले.