सांगली :
जिल्हा बँकेचे सीईओ शिवाजी वाघ यांच्या कारभारावरुन काही संचालकांनी बैठकीतच संताप व्यक्त केला. जिल्ह्यातील एकाही तालुक्याच्या शाखेला भेट न देता मुख्यालयात बसून कारभार कसा होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याने बैठकीतील वातावरण तापले. बँकेच्या एकूणच कारभारावरुन संचालक मंडळात मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सांगली जिल्हा बँकेच्या गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीतील हे वाद नुकतेच समोर आले. सुरुवातीला सभेच्या अहवालावरुन वाद निर्माण झाला. डिसेंबरनंतर नवे संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. म्हणजे २०२१-२२ या आर्थिक वर्षातील त्यांचे योगदान तीन महिन्याचे आहे. तरीही जुने पदाधिकारी, संचालक मंडळ व तत्कालिन अधिकाऱ्यांचा उल्लेख अहवालात नसल्यावरुन सवाल उपस्थित झाला. जुन्या संचालक मंडळाचे संबंधित नफ्यात व बँकेच्या प्रगतीमधील योगदान झाकण्याचा प्रयत्न केल्याची टीका एका संचालकाने केली. त्यामुळे बैठकीतील वातावरण तापले. सीईओ शिवाजी वाघ यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले.
वाघ यांनी आजवर एकाही तालुक्याच्या शाखेला का भेट दिली नाही? केवळ बँकेच्या वातानुकुलीत कार्यालयात बसूनच कारभार होणार आहे का? बँकेच्या थकबाकीचा डोंगर कमी करायचा आहे, तर जिल्हाभर प्रमुख अधिकाऱ्यांनी फिरायला नको का? असे अनेक सवाल बैठकीत उपस्थित करण्यात आले. मागील संचालक मंडळात असणाऱ्या काही संचालकांनीही अहवालातील दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली.
जिल्हा बँकेत संचालकांत मतभेद आहेत. मागील संचालक मंडळाच्या कार्याचा उल्लेख टाळल्यावरुन ही नाराजी व्यक्त केली जात आहे. मतभेदाच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. धोरणात्मक निर्णय घेतानाही असे मतभेद दिसून येत आहेत.