सांगली : येत्या दोन महिन्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची निवडणूक होणार असून, त्यासाठी राजकीय समीकरणांवर आतापासून चर्चा सुरू झाली आहे. गतवेळी पक्षापेक्षा स्थानिक राजकारणाला महत्त्व देऊन पॅनेलपद्धतीने निवडणुका झाल्या होत्या. यंदा या निवडणुकांवर राज्यातील राजकारणाचा प्रभाव राहणार आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्हा बॅँकेत होण्याची चिन्हे असल्याने भाजपला स्वबळावर ही निवडणूक लढवावी लागू शकते.
जिल्हा बॅँकेच्या गत निवडणुकीत जयंत पाटील यांनी शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून राष्टÑवादीसह भाजप, शिवसेना व काही कॉँग्रेस नेत्यांनाही एकत्रित आणले होते. कॉँग्रेसने स्वतंत्रपणे रयत पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती, मात्र ऐनवेळी कॉँग्रेस नेते मदनभाऊ पाटील यांनी जयंत पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ही निवडणूक स्थानिक राजकारणाने व्यापली होती. त्यावेळी कॉँग्रेस आणि राष्टवादी एकत्रित नव्हते.
आता राज्यात कॉँग्रेस, राष्टवादी आणि शिवसेना एकत्रित महाविकास आघाडीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारी बॅँका, संस्थांच्या निवडणुकांवरही या महाविकास आघाडीचा प्रभाव पडला आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून त्याबाबत प्रयत्नही चालू आहेत. सांगली जिल्हा परिषदेत असा प्रयत्न फसला असला, तरी हे प्रयोग अद्याप थांबलेले नाहीत.
त्यामुळे सांगली जिल्हा बॅँकेत यंदा महाविकास आघाडीचा प्रयोग राबविण्याची चर्चा राष्टÑवादी व कॉँगे्रसच्या गोटात सुरू आहे. भाजपला सोबत घेऊन जाण्याची त्यांची मानसिकता नाही. त्यामुळे भाजपला या निवडणुकीत एकाकी झुंज द्यावी लागण्याची चिन्हे आहेत. गत निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनेलने सत्ता काबीज करीत ती पाच वर्षे अबाधित राखली. जयंत पाटील यांचा अजूनही या बॅँकेवर प्रभाव असल्यामुळे यंदाही ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांची ताकद आजमावण्याच्या तयारीत आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बॅँक ही जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी वित्तीय संस्था असल्यामुळे याठिकाणी सत्तेचा खेळ प्रतिष्ठेचा बनविला जातो. यंदा त्याची तीव्रता अधिक असणार आहे. राज्यातील सत्ताधारी म्हणून महाविकास आघाडी ताकदीने या निवडणुकीत उतरण्याची तयारी करीत आहे, तर भाजपमार्फतही तितक्याच जोरदारपणे निवडणुका लढविल्या जातील.
बॅँकेच्या संचालकांपैकी सर्वाधिक संचालक राष्टवादीचे आहेत. त्याखालोखा कॉँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचा क्रमांक लागतो. दोन्ही कॉँग्रेस आणि शिवसेनेच्या संचालकाचा विचार केल्यास ही टक्केवारी ६० च्या घरात जाते. त्यामुळे जिल्हा बॅँकेत आजही महाविकास आघाडीचे बाहुबल अधिक आहे.
पुढील आठवड्यात बैठकाजिल्हा बॅँक निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठका घेण्याचे नियोजन दोन्ही कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू आहे. प्राथमिक चर्चेनंतर वरिष्ठ नेत्यांना त्याबाबतचा अहवाल पाठविला जाणार आहे.