सांगली : सर्वोदय साखर कारखान्याचे स्वतंत्र अस्तित्व असून आजही तो सभासदांच्या मालकीचा आहे. त्यावर कर्ज मागण्याचा राजारामबापू कारखान्यास कायदेशीर अधिकार नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ‘सर्वोदय’साठी १०७ कोटीचे कर्ज मंजूर केले आहे. याप्रकरणी जिल्हा बँकेला न्यायालयात खेचू, असा इशारा कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, जिल्हा बँकेने राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव युनिटसह स्वतंत्र अस्तित्व असलेल्या सर्वोदय व जतच्या डफळे कारखान्याला कर्ज दिले आहे. हे दोन्ही कारखाने आपल्या मालकीचे आहेत, असे राजारामबापू कारखान्याकडून सांगितले जात असले तरी, ते साफ खोटे आहे. या दोन्ही कारखान्यांच्या सभासदांनी विक्री प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिलेले आहे. सर्वोदय कारखाना पूर्णत: सभासदांच्याच मालकीचा आहे. फक्त सशर्त विक्री कराराचा आधार घेऊन तो चालविला जात आहे. आम्ही २०१३ मध्येच राजारामबापू कारखान्याला पैसे परत करण्याची तयारी केली होती. साखर लवादानेही मूळ रक्कम व्याजासह स्वीकारण्याचे आदेश दिले होते, पण त्यांनी ते स्वीकारले नाही. त्यासाठी जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. सभासदांच्या मालकीच्या सर्वोदय कारखान्याच्या मालमत्तेवर शेकडो कोटीचा बोजा चढविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. जिल्हा बँकेत राष्ट्रवादीची सत्ता असल्याने या षड्यंत्राला साथ दिली जात आहे. या कर्जालाच आम्ही कायदेशीर आव्हान देत आहोत. सभासदांची, संचालक मंडळाची मान्यता किंवा मागणी नसताना कर्ज कसे मंजूर केले, याचा खुलासा जिल्हा बँकेला करावा लागेल. (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेला न्यायालयात खेचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2015 12:40 AM