सांगली : कर्जाच्या थकीत ९0 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिल्हा बँकेने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा प्रतीकात्मक ताबा घेतला. यासंदर्भातील नोटीस बँकेने प्रसिद्ध केली असून, कारखान्याची देय असणारी ऊसबिले, कामगार देणी, शासकीय देणी देण्याची जबाबदारी बँकेने स्वीकारली आहे. जिल्हा बॅँकेने जानेवारी महिन्यात सिक्युरिटायझेशन अॅक्टनुसार कारखान्यास नोटीस बजावली होती. मार्चअखेर थकबाकीची रक्कम जमा केली नाही, तर एप्रिलमध्ये कारखान्याचा ताबा घेऊन कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याची तयारी होती. मात्र कारखान्याने थकबाकी भरण्याबाबत कोणतीही हालचाल न केल्याने सिक्युरिटायझेशन अॅक्टनुसार जिल्हा बँकेने मंगळवारी कारखान्याचा ताबा घेतला. बँकेचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह सर्व संचालकांना नोटीस बजावली होती. यामध्ये थकबाकी ९0 कोटी ५५ लाख ४६ हजार इतकी दर्शविण्यात आली आहे. त्यावर १ जानेवारी २0१७ पासूनचे व्याजही आकारण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या मालमत्तेच्या संबंधाने कोणताही व्यवहार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पूर्वसंमतीखेरीज करू नये आणि तसा व्यवहार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही प्राधिकृत अधिकारी मानसिंग पाटील यांनी दिला आहे. जिल्हा बॅँकेला यंदा शंभर कोटी रुपयांच्या नफ्याचे उद्दिष्ट आहे. नोटाबंदीचा मोठा फटका बसल्याने उद्दिष्टपूर्ती कठीण ठरण्याची चिन्हे होती. तरीही बॅँकेचे अध्यक्ष आणि प्रशासनाने यातून मार्ग काढत चांगल्या वसुलीच्या दिशेने पावले टाकली आहेत. वसंतदादा कारखान्यासह माणगंगा सूतगिरणी, माणगंगा साखर कारखाना आणि माणगंगा गारमेंट या थकबाकीदारांना जिल्हा बँकेने नोटिसा बजावल्या आहेत. या चार संस्थांची थकबाकी दीडशे कोटींच्या घरात आहे. त्यामुळे ही वसुली झाली, तर जिल्हा बॅँकेचे यंदाचे शंभर कोटी नफ्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते. त्यामुळे बॅँक प्रशासन आता सरसावले असून, कडक भूमिका स्वीकारली आहे.गतवर्षाच्या नफ्याचा विचार करता, यंदाचे उद्दिष्ट फारसे अवघड नव्हते. मात्र रिझर्व्ह बँकेच्या विचित्र धोरणामुळे बॅँकेसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. नोटाबंदीच्या काळात दोन ते तीन महिने ठप्प असलेले जिल्ह्यातील बॅँकेचे व्यवहार आणि ३१५ कोटींच्या जुन्या शिल्लक रकमेवरील व्याजाचा फटका, या दोन गोष्टी सर्वांत जास्त चिंतेच्या होत्या. (प्रतिनिधी)स्थावर व जंगम मालमत्ता ताब्यातकारखान्याची सर्व प्रकारची स्थावर व जंगम मालमत्ता जिल्हा बॅँकेने ताब्यात घेतली आहे. जंगम मालमत्तेत केन हॅँडलिंग अॅन्ड फिडिंग विभाग, मिल हाऊस, क्लोरिफिकेशन, वर्कशॉप, डिस्टिलरी, कंट्री लिकर, पॉवर हाऊस अशा बारा विभागांचा समावेश आहे.
वसंतदादा कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेकडे
By admin | Published: March 29, 2017 1:01 AM