सांगली : खातेदारांच्या केवायसी पडताळणीसाठी सांगली जिल्हा बँकेत १३ फेब्रुवारीस दाखल झालेल्या नाबार्डच्या पथकाने सोमवारी तपासणी पूर्ण केली. पथकामार्फत आता अहवाल तयार करण्याचे काम सुरू असून, दोन दिवसात हे पथक परतणार असून त्यानंतर आठवडाभराने रिझर्व्ह बँकेकडून केवायसी पूर्तता प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. सांगली बँकेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच केवायसी पूर्ततेबद्दलची माहिती नाबार्ड व भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सादर केली होती. त्यानंतरही बँकेच्या अधिकाऱ्यांना कधी पुण्याला, तर कधी मुंबईला नाबार्डच्या कार्यालयात बोलाविण्यात आले. त्याठिकाणीही दिलेल्या नमुन्यात माहिती सादर करण्यात आली आहे. तरीही पुन्हा नाबार्डचे दोन अधिकाऱ्यांचे पथक १३ फेब्रुवारीस जिल्हा बँकेत दाखल झाले आहे. केवायसीबाबतची पडताळणीची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. बँकेकडे अजूनही जुन्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून ३१५ कोटी रुपये पडून आहेत. जिल्हा बँकेने या नोटा करन्सी चेस्टकडून स्वीकारल्या जाण्याबाबत वारंवार विनंती केली. त्यावर केवायसीचे कारण सांगण्यात आले. सांगली जिल्हा बँकेच्या केवायसीबद्दल अद्याप नाबार्डकडून कोणताही अहवाल तयार झालेला नाही. केवळ कागदपत्रांच्या तपासणीचे सत्र सुरू आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुरुवातीला जिल्हा बँकांना अन्य बँकांपेक्षा वेगळा नियम लागू करण्यात आला. या बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली. त्यानंतर नव्या नोटा उपलब्ध करून देण्यावरही निर्बंध आणले होते. आता चलनाचा पुरवठा होत असला तरी, शिल्लक रकमेवरील व्याजाचा फटका जिल्हा बँकेस मोठ्या प्रमाणावर बसत आहे. नाबार्ड, आयकर, फायनान्स इन्टेलिजन्स युनिट, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अशा अनेक संस्थांमार्फत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत चौकशीचे सत्र सुरू होते. यातील एकाही तपासणीत काही आढळल्याचे या शासकीय यंत्रणांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे आता केवळ केवायसीची पडताळणी नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी हाती घेतली आहे. (प्रतिनिधी)
नाबार्डकडून जिल्हा बँकेची तपासणी पूर्ण
By admin | Published: February 20, 2017 11:56 PM