सांगली : कृषी विधेयकाविरोधात पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यातील अनेक पक्ष, संघटनांनी प्रतिसाद दिला असून, त्यांनी येथील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व घटकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सांगली जिल्ह्यातील या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आयटक, जनसेवा फळे, भाजीपाला विक्रेता संघटना, सीपीआय, आम आदमी पक्ष, शेतकरी व कामगार पक्ष, किसान सभा, नागरिक जागृती मंच आदी पक्ष, संघटनांनी सहभाग घेतला आहे. केंद्र सरकारने कृषी विधेयकांसह कामगार कायद्यातील बदलांविषयीचे विधेयक त्वरित मागे घ्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीत गेली आठवडाभर आंदोलने सुरू आहेत.
सांगलीत सध्या ‘किसान बाग’ आंदोलनही करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही शेतकऱ्यांच्या म्हणजेच सर्वांच्या पोशिंद्याला संकटात मदत करण्यासाठी सर्व घटकांनी साथ द्यावी, असे आवाहन केले आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीही पूर्ण ताकदीने यात उतरत आहे. या आंदोलनास पाठिंबा वाढत आहे. रुग्णालये, औषध दुकाने व अन्य अत्यावश्यक सेवा चालू ठेवून अन्य व्यावसायिकांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट
सांगलीत रॅली
सर्व बाजारपेठा, प्रमुख मार्ग, चौक याठिकाणच्या व्यावसायिकांना बंद पाळण्याचे आवाहन करीत सांगलीतून रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता स्टेशन चौकातून ही रॅली सुरू होणार आहे. त्यानंतर प्रमुख मार्गावरुन ती विश्रामबागपर्यंत येईल. त्यानंतर शंभर फुटीमार्गे पुन्हा शहरातील प्रमुख मार्गाने ती स्टेशन चौकात येणार आहे. त्यानंतर रॅलीची सांगता होईल, असे किसान सभेचे नेते कॉ. उमेश देशमुख यांनी सांगितले.
चौकट
फळे, भाजीपाला विक्री बंद
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी आंदोलनादिवशी कोणताही शेतीमाल बाजारात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.