सांगलीः सांगली- इस्लामपूर बायपास रस्त्यावरील मातोश्री पेट्रोलपंपावर मंगळवारी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम पाटील यांच्या पथकाने छापा टाकला.
प्राथमिक तपासणीत पेट्रोलमध्ये भेसळ, तेल साठ्यात तफावत आढळून आली. याप्रकरणी पेट्रोल पंप सील करण्यात आला असून चालकावर जीवनावश्यक वस्तू नियंत्रण कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे काळम-पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
बायपास रस्त्यावर या पेट्रोलपंपाचे चालक महेंद्र भालेराव ( रा. जळगाव) आहे. त्यांनी महिन्यापूर्वीच हा पंप चालविण्यासाठी घेतला आहे. या पंपाबाबत काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत आज जिल्हाधिकाऱ्यांनी पथकास छापा टाकला.
जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे हेही कारवाईत सहभागी झाले होते. तब्बल पाच तास पंपाची तपासणी सुरू होती. या पंपावर भेसळ आढळून आले आहे. तसेच डेनस्टी ( घनता) यामध्ये तफावत आहे.
पंपचालकाने तेल साठ्याचे रजिस्टर अद्यावत ठेवलेले नाही. पेट्रोलचे नमुने घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासणीत दोष आढळल्याने पंप सील करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हा प्रशासनाकडून जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली पोलिसांत फिर्याद देणार असल्याचे जिल्हाधिकारी काळम-पाटील यांनी सांगितले.