कवठेमहांकाळ : पैजेत पराभव झाल्याची जबाबदारी स्वीकारत व दिलेला शब्द पाळत कवठेमहांकाळ जिल्हा परिषदेचे सदस्य गजानन कोठावळे यांनी आज (शनिवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला. या घटनेने कवठेमहांकाळ तालुक्यात खळबळ माजली आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी कवठेमहांकाळ जिल्हा परिषद सदस्य गजानन कोठावळे व मळणगाव पंचायत समिती सदस्य बाळासाहेब कुमठेकर यांच्यात कवठेमहांकाळ येथील पंचायत समितीमध्ये पैज लागली होती. स्वत:ची राजकीय खुर्ची या दोघांनीही पैजेखातर डावावर लावली होती. गजानन कोठावळे हे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात, तर बाळासाहेब कुमठेकर हे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे समर्थक आहेत. कवठेमहांकाळ जिल्हा परिषद गटातून व मळणगाव पंचायत समिती गणातून काँग्रेसचे प्रतीक पाटील यांना मताधिक्य मिळाल्यास बाळासाहेब कुमठेकर यांनी पंचायत समिती सदस्यत्वाचा राजीनामा द्यावयाचा तर कवठेमहांकाळ जि.प. गटातून व मळणगाव पंचायत समिती गणातून भाजपाचे संजय पाटील यांना मताधिक्य मिळाल्यास गजानन कोठावळे यांनी जि. प. सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा, अशी पैज लागली होती. दोन्ही पदाधिकार्यांनी पैजेवर शिक्कामोर्तब केले. शुक्रवारी निवडणुकीचा निकाल लागला व कवठेमहांकाळ जि.प. गट व मळणगाव पंचायत समिती गणात भाजपचे संजय पाटील यांना मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे ही पैज कुमठेकर यांनी जिंकली. ठरलेल्या पैजेतील शब्द पाळत आज गजानन कोठावळेंनी सांगली येथे जाऊन जिल्हा परिषद अध्यक्ष देवराज पाटील यांच्या स्वीय सहाय्यकांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे मोठी राजकीय चर्चा कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू असून, कोठावळे यांनी राजीनामा माघारी घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु कोठावळे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. (वार्ताहर)
जिल्हा परिषद सदस्याचा पैज हरल्याने राजीनामा... सांगली लोकसभा : प्रतीक पाटील यांच्या बाजूने डाव
By admin | Published: May 18, 2014 12:21 AM