मिरज : मिरजेत जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे आयोजित वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला. गुरुवारी उद्घाटनाचा पहिला सामना जेकेएफ व विटा एफसी यांच्यामध्ये खेळविण्यात आला. या सामन्यात जेकेएफ संघाने विजयी सलामी दिली.
विटा एफसी विरुध्द जेकेएफ मिरज यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. पूर्वार्धात विटा संघाच्या सुमुख शेळके याने गोल नोंदवून आपल्या संघास आघाडी मिळवून दिली. मात्र जेकेएफचे खेळाडू शुभम दबडे व आश्रफ शेख यांनी विटा संघाची बचावफळी भेदत २ गोल नोंदवून विजय मिळविला. जेकेएफ संघातून खेळणाऱ्या नगरसेवक करण जामदार यांना प्रेक्षकांनी जोरदार प्रोत्साहन दिले.
सामने २ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून, साखळी पध्दतीच्या स्पर्धेत जिल्ह्यातील १६ संघ सहभागी आहेत. स्पर्धेचे उद्घाटन सुरेश आवटी, नगरसेवक गणेश माळी, आनंदा देवमाने, विवेक कांबळे यांनी केले. शाबीर शेख, मुन्ना नायकवडी,अतिश अग्रवाल, राजू कांबळे, डी. जे. कांबळे, रमेश माने, राजेंद्र कांबळे यांनी संयोजन केले. पंच म्हणून दिलावर नरवाडे, शशी साबळे, सतीश शिकलगार यांनी काम पाहिले. आज, शुक्रवारी प्रॅक्टिस क्लब विरुध्द बीबीसी फुटबॉल यांच्यादरम्यान, तर दुसरा सामना मंगळवार पेठ विरुध्द डायमंड फुटबॉल संघांदरम्यान होणार आहे. या सामन्यांसाठी फुटबॉल प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. स्पर्धांना प्रेक्षकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.विटा एफसी विरुध्द जेकेएफ मिरज या उद्घाटनाच्या सामन्यात जेकेएफ संघाने विजयी सलामी दिली.