लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जोरदार वाºयासह मुसळधार पावसाने रविवारी सायंकाळी सांगलीला झोडपले. जिल्ह्याच्या अन्य भागातही शनिवारी रात्री पाऊस झाला. येत्या १३ सप्टेंबरपर्यंत पावसाची अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.सांगलीत सकाळपासून आकाश निरभ्र होते. उकाडाही जाणवत होता. सायंकाळी अचानक ढगांची दाटी झाली आणि सायंकाळी साडेपाच वाजता पावसास सुरुवात झाली. जोरदार सरींनी सांगलीला चिंब भिजविले. शहराच्या सखल भागात पाणी साचले होते. गेल्या आठवड्यातही गुरुवारी मोठा पाऊस झाला होता. शनिवारी केवळ ढगांची दाटी आणि तुरळक सरींनी हजेरी लावली होती. रात्री पावसाची चिन्हे होती; मात्र मोठा पाऊस झाला नव्हता. रविवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात तासगाव, कवठेमहांकाळ, शिराळा, वाळवा परिसरातही पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.गव्हाण परिसरात वीजपुरवठा खंडितगव्हाण : गव्हाण, अंजनी, नागेवाडी, वडगाव, वज्रचौंडे परिसरात विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पडला. पावसाने रात्री उशिरापर्यंत हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी केले. काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शनिवारी दिवसभर वातावरणात उष्मा वाढला होता. सायंकाळी ७ च्या सुमारास ढग दाटून आले होते. रात्री १० नंतर जोरदार पावसास सुरुवात झाली. चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय मिटली असून, शेतकरी वर्ग आनंदीत झाला आहे.कोकरूड परिसरात दमदार पाऊसकोकरुड : गेल्या तीन दिवसांपासून कोकरुडसह परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली असून, रविवारीही विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. ओढ दिलेल्या पावसाने शुक्रवारी जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फायदा खरीप हंगामातील भात, भुईमूग या पिकांना झाला आहे. सध्या मेणी, शिरसटवाडी, सावंतवाडी, गवळेवाडी, आटुगडेवाडी या परिसरात मका पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्याची काढणी सध्या सुरु झाली असून, रब्बी हंगामातील पेरणीला चार दिवसात सुरुवात होणार आहे. रविवारी दिवसभर कोकरुड, चिंचोली, खुजगाव, शेडगेवाडी, येळापूर, मेणी, हत्तेगाव परिसरात उकाडा जाणवत होता. सायंकाळी ६ वाजल्यानंतर जोरदार वारा सुटला. त्यानंतर ७ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. या पावसामुळे परिसरातील सर्व पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत.
जिल्ह्यात सलग दुसºयादिवशी मुसळधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:17 AM