सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या घटत चालल्याने व्यापाऱ्यांसह इतर घटकांना दिलासा देताना उद्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पॉझिटिव्हिटी रेट सरासरी १२ ते १४ टक्के व बेडची उपलब्धता ४७ टक्क्यांपर्यंत असल्याने जिल्ह्याचा समावेश चौथ्या स्तरात झाला असून, त्यानुसार निर्बंध हटविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या हजारावर स्थिर आहे. दुसऱ्या लाटेत प्रशासनासह नागरिकांनाही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने कडक निर्बंध घातले होते. जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनची अंमलबजावणी केली होती. आता रूग्णसंख्या कमी होत असल्याने व्यवसाय सुरू करण्याबरोबरच सर्व घटकांना दिलासा देण्याची मागणी होत होती. जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना प्रशासनाने सकाळी अकरापर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. आता यात वाढ झाली असून, सायंकाळी चारपर्यंत वेळ वाढविण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसह इतरही व्यावसायिकांना याचा लाभ होणार आहे. सलून व्यावसायिकांना आता परवानगी देण्यात आली असली तरी ज्यांनी लस घेतली आहे, अशा ग्राहकांनाच त्यांना सेवा देता येणार आहे.
चौकट
१. पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेडवर रूग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पहिल्या स्तरात येईल.
२. पॉझिटि्व्हीटी रेट पाच टक्के व २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेडवर रूग्ण उपचार घेत असतील तर तो भाग दुसऱ्या स्तरात येईल.
३. पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के ते २० टक्के आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रूग्ण उपचार घेत असतील तर तो भाग तिसऱ्या स्तरात येईल.
४. पाॅझिटिव्हिटी रेट १० ते २० टक्के आणि ६० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रूग्ण उपचार घेत असतील तर तो भाग चौथ्या स्तरात येईल.
५. पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यांपेक्षा अधिक आणि ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेडवर रूग्ण उपचार घेत असतील तर तो भाग पाचव्या स्तरात येईल.
चाैकट
काय सुरू राहील?
* अत्यावश्यक सेवा असलेली दुकाने दुपारी चारपर्यंत सुरु राहणार आहेत.
* रेस्टॉरंट, हॉटेलमधून केवळ पार्सल सेवेला परवानगी देण्यात आली आहे. ग्राहकांना थेट सेवा बंद असेल.
* सार्वजनिक ठिकाणी वॉकिंग, व्यायाम, योगा यासाठी सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते सकाळी ९ तर सायंकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत परवानगी असेल. शनिवार, रविवारी परवानगी नाही.
* लग्न समारंभाला २५ लोकांच्या उपस्थितीत परवानगी असेल.
* सर्वप्रकारच्या बांधकामांना परवानगी असणार आहे.
* ५० टक्के क्षमतेसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी असेल मात्र उभे राहून प्रवास करता येणार नाही.
* सलून, स्पा, ब्युटी पार्लर यांना चारपर्यंत केवळ ५० टक्के क्षमतेने परवानगी. केवळ लस घेतलेल्यांना सेवा देता येणार आहे.
चौकट
काय बंद राहील?
अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने उघडण्यास परवानगी असणार नाही. मॉल, थिएटर बंदच राहतील.
सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही, तर नाट्यगृहेही बंद राहणार आहेत.
ग्राहकांना सेवा देणाऱ्या हॉटेलना परवानगी नाही, शिवाय अत्यावश्यक कारणांशिवाय ई-कॉमर्स सेवेलाही परवानगी असणार नाही.
कोट
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत असली तरी अद्यापही संसर्ग कायम आहे. शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून आणखी शिथिलता देण्यात येणार असली तरीही रूग्णसंख्या वाढल्यास पुन्हा निर्बंध सुरू करण्यात येतील.
डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी