सांगली : संपूर्ण सांगली जिल्ह्यात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली आणि सर्व तालुका विधी सेवा समिती मार्फत दिनांक 9 ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत घरोघरी जाऊन राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
या अभियानाची सुरूवात राष्ट्रीय विधी सेवा दिनी दिनांक 9 नोव्हेंबर रोजी वन प्रबोधिनी, कुंडल येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व हस्ते झाली. पाटील यांनी विधी सेवा माहिती अभियानाची माहिती घरोघरी जाऊन देवून गरजु लोकांना त्यांचे अधिकार विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मिळवून द्यावेत, असे आवाहन केले. या कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश ए. एन. पाटील, सातवलेकर, जगताप, पेरमपल्ली, दिवाणी न्यायाधीश केस्तीकर, इंदलकर, रुद्रभाटे यांनी विविध कायद्यांची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली चे सचिव विश्वास माने यांनी केले. आभार न्यायाधीश पलुस सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा वन अधिकारी भोसले, श्रीमती कट्टे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे नागणे, मोरे आणि माळी यांनी सहकार्य केले.