मिरज : तालुक्यातील म्हैसाळ येथे १६ हजार ब्रास अवैध माती उपसा करुन १ कोटी ६४ लाखाची माती चोरून नेल्याप्रकरणी ६ शेतकरी व १७ वीटभट्टी चालक अशा २३ जणांविरूध्द ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाईसह माती चोरीचे गुन्हे दाखल करण्याची कारवाई केल्याने शेतकरी व वीटभट्टी चालकांत खळबळ उडाली आहे.म्हैसाळ येथे नदीकाठी माती उपसा करण्यासाठी वीटभट्टी चालकांना परवाना देण्यात आला आहे. मात्र नदीकाठी परवान्यापेक्षा जास्त माती उपसा केल्याच्या तक्रारी आहेत. म्हैसाळात नदीकाठी भरमसाट माती उपशामुळे नदीपात्राला धोका निर्माण झाला आहे.
माती उपशाने नदीपात्र मोठे होत आहे. म्हैसाळमधील माती उपसा जोरात असताना, स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.वीटभट्टी चालकांना शासनाची रॉयल्टी भरून माती उपसा परवाना देण्यात आला होता.
मात्र विटा बनविण्यासाठी मातीला आता सोन्याचा भाव आल्याने परवान्यापेक्षा दहापट माती उपसा करण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत सुमारे १६ हजार ४३४ ब्रास मातीचे जादा उत्खनन करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.याप्रकरणी तहसीलदारांनी संबंधित शेतकऱ्यांना सुमारे साडेपाच कोटी रूपये दंड वसुलीच्या नोटिसा दिल्या आहेत. मातीचोरीप्रकरणी बेडगचे मंडल अधिकारी राजू विलास जाधव यांनी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.दादासाहेब बाबगोंडा पाटील, रावसाहेब बाबगोंडा पाटील, वसंत नरासाप्पा मगदूम, शरद होनमोरे, मनोहर होनमोरे, मनोज पाटील (रा. म्हैसाळ) या सहा शेतकऱ्यांसह महेश दिनकर बोंद्रे, सुभाष बजंत्री, सूरज कुंभार, जयपाल कुंभार, अनिल पाटील, सुनील कुंभार, रवींद्र कुंभार, जयगोंडा पाटील, अनिल पाटील, कृष्णाकांत चव्हाण, शांतिनाथ पाटील, जयेंद्र कुंभार यांच्यासह १७ जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.