सांगली : जिल्ह्याच्या किमान तापमानात घट होत असून, शनिवारी पारा १५ अंशापर्यंत खाली उतरला. कमाल तापमान ३२ अंशावर स्थिर आहे. रात्रीची थंडी वाढत असून, यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याच्या किमान तापमानात गेल्या चार दिवसांत गतीने घट झाली. पारा सध्या डिसेंबरमधील सरासरीपेक्षा अंशाने कमी आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा अंशाने अधिक आहे. त्यामुळे दिवसभर साधारण वातावरण व रात्री बोचरी थंडी अनुभवास येत आहे. भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार येत्या सहा दिवसात किमान तापमानात आणखी अंशाने घट होणार असून, पारा १४ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३२ ते ३३ अंशापर्यंत स्थिर राहणार आहे. त्यात घट होण्याची चिन्हे नाहीत. आगामी आठवडाभर आकाश निरभ्र राहणार आहे. थंडी वाढत असल्याने आता ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडीपासून बचावासाठी ऊबदार कपड्यांचा आधार नागरिकांना घ्यावा लागत आहे.