सांगली : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रभारी अध्यक्ष रणजित पाटील यांनी मंगळवारी झाडाझडती घेतली. आठ दिवसात सर्व फायली पूर्ण केल्या पाहिजेत. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. शिक्षणचे दोन कर्मचारी आणि वित्त विभागाचा एक कर्मचारी गैरहजर राहिल्याचे त्यांच्या भेटीत निदर्शनास आले.जिल्हा परिषद शिक्षण विभाग गेल्या दोन वर्षांपासून वादग्रस्त बनला आहे. नियमानुसार असलेल्या फायलींनाही या विभागातून मंजुरी मिळत नाही. शिक्षकांना सन्मानाची वागणूकही कर्मचारी देत नसल्याच्या तक्रारी आहेत. कर्मचाऱ्यांच्या गैरकारभाराला अंकुश लावण्याऐवजी त्याचे समर्थनही काही अधिकारी करीत आहेत. यामुळे विभागातील सावळा गोंधळ वाढला आहे. काही लोकप्रतिनिधीही शिक्षकांची लूट करू लागले आहेत. यामुळे शिक्षण विभाग राज्यभर बदनाम झाला आहे. या शिक्षण विभागाचे सभापतीपद आणि आता जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्षपद रणजित पाटील यांच्याकडे आहे. शिक्षण विभागातील गैरकारभार शंभर टक्के थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांनी कठोर निर्णय घेतले आहेत. शिक्षण विभागास मंगळवारी त्यांनी सकाळी साडेदहा वाजता अचानक भेट देऊन कर्मचारी, अधिकारी कार्यालयात आहेत का? याचा शोध घेतला. यावेळी दोन कर्मचारी गैरहजर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याचबरोबर कामानिमित्त शिक्षकांनीही मोठी गर्दी कार्यालयात केल्याचेही निदर्शनास आले. यावरून त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पंचनामा केला. शिक्षकांची कार्यालयात फाईल आल्यानंतर आठ दिवसात ती पूर्ण करून त्यांच्या हातात मिळाली पाहिजे. फायली पेंडिंग राहिल्यास दोषी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा रणजित पाटील यांनी दिला आहे. त्यांच्या भेटीमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली होती. कागदपत्रे व्यवस्थित ठेवून फायली पूर्ण करण्यासाठी दिवसभर कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू होते.शिक्षण विभागाबरोबरच त्यांनी जिल्हा परिषदेतील वित्त विभागासही भेट देऊन पाहणी केली. येथे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. एक कर्मचारी कार्यालयात येऊन कामासाठी बाहेर गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याची चौकशी करण्याची सूचना रणजित पाटील यांनी खातेप्रमुखांना दिली. (प्रतिनिधी)शिक्षण विभागातील ठाणेदारांना हलविलेशिक्षण विभागातील गैरकारभाराला आळा घालण्यासाठी तेथील एकाच टेबलला अनेक वर्षे चिकटून बसलेल्या ठाणेदारांना रणजित पाटील यांनी हलविले. त्यामुळे शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. बदल केलेल्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी काम न केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जि. प. अध्यक्षांकडून शिक्षण विभागाची झाडाझडती
By admin | Published: June 28, 2016 11:34 PM