सांगली : जिल्ह्यातील विकासकामांच्या निधी मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या व कामांचा आढावा घेण्यासाठी उद्या, शनिवारी जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ही सभा होणार आहे. प्रशासनाच्या वतीने सभेची तयारी सुरू आहे.
डीपीडीसी अर्थात जिल्हा नियाेजन समितीच्या सभेसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू होती. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समितीचा निधी वळविण्यात आला होता. यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास अवघा दोन महिन्यांचा कालावधी उरल्याने इतर विकासकामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा वार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे. शनिवारी होणाऱ्या सभेत यास मंजुरी मिळणार आहे.
यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास कमी कालावधी उरला असतानाही अनेक शासकीय विभागांनी त्यांना मंजूर केलेल्या निधीचा विकासकामांवर विनियोग करण्यात आलेला नाही. त्यामुळे या सभेत त्यावर वादळी चर्चा हाेण्याची शक्यता आहे.
चौकट
निधीचा उपयोग होणार कधी?
दरवर्षी जिल्हा वार्षिक आराखड्यातून निधीची मंजुरी मिळते. मात्र, अनेक विभाग त्यांचा प्रस्तावच सादर करत नसल्याने अनेकदा हा निधी पुन्हा शासनजमा होत असतो. जिल्ह्यासाठी हा निधी पुन्हा मिळविण्यासाठी कसरत करावी लागत असल्याने निधीच्या उपयोग न करणाऱ्या विभागांना केवळ इशारा न देता कारवाई केली, तरच निधीचा विनियोग होणार आहे.