लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पोलिसांनी केवळ कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीच काम केले नसून कोरोना कालावधीत समाजावरही नियंत्रण ठेवले आहे. जनतेच्या सुरक्षेप्रती काम करणाऱ्या पोलिसांना साधनसुविधांचीही आवश्यक असते. ती पूर्ण करण्यासाठी व जिल्हा पोलीस दल अधिक आधुनिक करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केले.
जिल्हा नियोजन समिती निधीतून पोलीस दलास मिळालेल्या २५ चारचाकी व ५० दुचाकी वाहनांच्या लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री पाटील बोलत हाेते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनाचा संसर्ग वाढला असताना, लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठीही पोलिसांनी काम केले. आवश्यकता असते त्यावेळी सामाजिक गरज ओळखून पोलीस काम करीत असतात. त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शहरासह जिल्ह्यात सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे महत्त्वाचे आहे. आता शहरातील कोपरा न कोपरा सीसीटीव्हीच्या नजरेत येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल.
विश्वजित कदम म्हणाले, पोलीस दलास आवश्यक त्या साधनांचा पुरवठा केला तर अधिक चांगल्याप्रकारे काम होईल. त्यामुळेच जिल्हा नियोजनच्या निधीतून पाेलीस दलासाठी तरतूद करण्यात आली आहे. पोलीस दलाचे मनोबल उंचाविण्यासाठी अजूनही काही उपक्रम राबविण्यास प्राधान्य देण्यात येईल.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी प्रास्ताविकात कामकाजाचा आढावा घेत, मिळालेल्या साधनांमुळे पोलीस दलाच्या कामकाजातील गतिमानता वाढणार असल्याचे सांगितले. अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुरेश खाडे, अनिल बाबर, सुमनताई पाटील, अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आदी उपस्थित होते.
चाैकट -
दीक्षित गेडाम यांच्या कामाचे कौतुक
पालकमंत्री पाटील म्हणाले, अधीक्षक म्हणून गेडाम यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून अनेक चांगले उपक्रम होत आहेत. चांगले अधिकारी म्हणून त्यांची ओळख असल्यानेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगलीत संधी दिली आहे. त्यांनी पोलिसांच्या पाल्यांसाठी प्लेसमेंट शिबिर घेतले हे कौतुकास्पद असून, तीस वर्षांत पहिल्यांदाच अधीक्षकांनी असा उपक्रम राबविला आहे.
चौकट
पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ‘भारती’तर्फे मोफत शिबिर
कृषी राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, पाेलीस कर्मचारी नेहमीच कर्तव्यावर असल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे भारती रुग्णालयातर्फे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करणार आहे.