सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत जिल्हा पोलीस दलाचा सक्रिय सहभाग आहे. त्यामुळेच राज्यात सर्वाधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतल्याने सांगली जिल्हा पोलीस दल राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. अधिकाऱ्यांचे लसीकरण ९८ टक्के, तर कर्मचाऱ्यांचे ९६ टक्क्यांपर्यंतचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोना कालावधीत संसर्ग रोखण्यासाठी आघाडीवर राहणाऱ्या पाेलिसांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी पहिल्याच टप्प्यात लस घेत इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन दिल्याने लसीकरणास गती मिळाली आहे.
राज्यातील पोलिसांसाठीच्या लसीकरणाच्या आढाव्यात सांगलीचा क्रमांक अव्वल असून अधिकाऱ्यांचे लसीकरण जवळपास पूर्ण होत आले आहे. इतर आजार असलेल्या कर्मचारी वगळता इतर सर्व लसीकरणास पोलिसांनीही प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, अधीक्षक गेडाम यांनी वारंवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे दिलेल्या सूचनांमुळेही लसीकरणाचा टक्का वाढलेला आहे.
चौकट
जिल्ह्यात एकूण पोलीस कर्मचारी २५६७
लस घेतलेेले पोलीस कर्मचारी २१७४
जिल्ह्यात एकूण पोलीस अधिकारी १४६
लसीकरण घेतलेले पोलीस अधिकारी १३२
चौकट
१० टक्के पोलिसांनी घेतला दुसरा डोस
जिल्ह्यात गेल्या महिन्यात पोलिसांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. पहिला डोस घेतलेल्या पोलिसांसाठी सोमवारपासूनच दुसरा डोस सुरू करण्यात आला आहे. त्यात २३ अधिकारी, तर २४१ पोलीस कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे.
चौकट
१) लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी अधीक्षक गेडाम यांनी स्वत: लक्ष दिले आहे. यापूर्वी जिल्ह्यात ३१९ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने पुन्हा बाधित होऊ नये यासाठी सर्वच कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी यासाठी नियाेजन करण्यात आले आहे.
२) पुरुष कर्मचाऱ्यांसह महिला कर्मचाऱ्यांनीही लसीकरणास प्रतिसाद दिला आहे. सध्या ७० टक्क्यांहून अधिक महिला कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने लस घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होत आले आहे.