सांगली : अनेक वर्षे सेवा करूनही त्या पदाचा लाभ न मिळता अनेक पोलीस कर्मचारी निवृत्त हाेत असतात. मात्र, आता सेवाज्येष्ठतेनुसार पोलिसांना आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत. पाेलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबत पाठपुरावा करीत जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केल्याने ६३८ पोलिसांना याचा लाभ होणार आहे.
पोलीस दलात कार्यरत असताना सेवेची दहा, वीस आणि ३० वर्षे पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना अगोदर आर्थिक लाभ मिळताना अडचणी येत असत. आता शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्वांना आर्थिक लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात अशा कर्मचाऱ्यांची ६३८ एवढी संख्या आहे. ३० वर्षे सेवा झालेल्या पाेलिसांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदाचा लाभ, २० वर्षे सेवा झालेल्यांना हवालदार पदाचा, तर १० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना नाईक पदाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पात्र होऊनही लाभ मिळत नसलेल्या पोलिसांना न्याय मिळाला आहे.
चौकट
रोखीने आर्थिक लाभ
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देत हे मंजूर करण्यात आलेले लाभ रोखीने देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.