सांगली : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने अखरे जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या. जिल्हाध्यक्षपदी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांची, तर शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. पद्माकर जगदाळे यांची निवड केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटाच्या राष्ट्रवादीच्या निवडी मुंबई येथे बुधवारी जाहीर केल्या. यामध्ये त्यांनी वैभव पाटील यांच्यावर जिल्हाध्य पदाची जबाबदारी दिली. जयंत पाटील यांचे अनेक वर्षे कट्टर समर्थक असलेले प्रा. पद्माकर जगदाळे यांची शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. माजी महापौर इद्रीस नायकवडी यांची राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आली. त्यांचा सत्कारही करण्यात आला.
सांगली जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा जिल्हा असल्याने याठिकाणी पक्ष फोडण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरू होता. मात्र, त्यांना फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे पदाधिकारी निवडी रेंगाळल्या होत्या. बुधवारी त्यांनी त्यांचेच एकेकाळचे सहकारी असलेल्या लोकांना एकत्र करून पदे दिली. पक्षवाढीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. मुंबईतील कार्यक्रमावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मनोज भिसे, अविनाश चोथे, विपुल तारळेकर आदी उपस्थित होते.
अजित पवार गटाने प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या असून, या पदाधिकाऱ्यांमार्फत शहर, जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यानंतर येत्या महिनाभरात अन्य सेलच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत, असे सांगण्यात आले.