सचिन लाड -सांगली मुदत ओलांडून गेलेल्या रिक्षा परवान्यांच्या नूतनीकरणासाठी परिवहन आयुक्तांनी दीड महिन्याची मुदत देऊनही रिक्षाचालकांनी त्यास ठेंगा दाखविला आहे. नूतनीकरणाची मुदत १६ नोव्हेंबरपर्यंत असली तरी, यामध्ये दुसरा शनिवार, दोन रविवार व दिवाळीची सुट्टी असल्याने केवळ सहा दिवस रिक्षाचालकांना मिळणार आहेत. आतापर्यंत तीस रिक्षाचालक नूतनीकरणास पुढे आले आहेत. रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रश्नी मौन धारण केले आहे. त्यामुळे नूतनीकरणास मुदत मिळूनही अडीच हजार परवाने बंद रद्द होण्याची चिन्हे आहेत.राज्यातील अनेक रिक्षा परवाने मुदतीत नूतनीकरण न झाल्याने ते बाद झाले आहेत. रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हे परवाने नूतनीकरण करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी दि. १ ते ३१ आॅक्टोबर या कालावधित चालकांनी परवाने नूतनीकरण करून घेण्याचा आदेश काढला होता; पण यासाठी वीस ते तीस हजार रुपये दंड आकारण्याचाही आदेश दिला होता. चालकांनी याप्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला होता. तीस हजार रुपये दंड हा मुंबई महानगर क्षेत्रासाठी होता. अन्य जिल्ह्यात दंड आकारण्याचा पूर्वीचा जो नियम होता, तोच नियम यामध्ये लागू करावा, असे परिवहन आयुक्तांनी आदेशात म्हटले होते. पण आदेश नेमका काय आहे, हे संघटनांच्या प्रतिनिधींना न समजल्याने त्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी परवाना नूतनीकरणासाठी प्रत्येक दिवसाला २० रुपये ते दोन हजारापर्यंत दंड आहे. २० ते ३० हजार रुपये दंड नाही, हे चालकांनी लक्षात घ्यावे. नूतनीकरणास ही शेवटची संधी असल्याने चालकांनी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले होते; पण तरीही याकडे दुर्लक्ष होत आहे.नूतनीकरणास चालकांना प्रतिसाद न मिळाल्याने परिवहन आयुक्तांनी पुन्हा १५ दिवसांची मुदत दिली. १५ नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन केले होते. तरीही चालकांना प्रतिसाद नाही. केवळ ३० चालकांनी अर्ज सादर केले आहेत. उर्वरित दोन हजार ४७० चालक अद्याप आले नाहीत. १६ नोव्हेंबरची मुदत असली तरी, यामध्ये शनिवार, रविवार व दिवाळीची सुट्टी असल्याने आरटीओ कार्यालय बंद राहणार नाही. चालकांना नूतनीकरणास बुधवारपासून केवळ सहा दिवस मिळणार आहेत. या सहा दिवसांत चालक न आल्यास हे परवाने रद्द होणार आहेत.नवी शक्कल : नूतनीकरण नाही, तर परवाना नाही!ज्यांचे परवाने नूतनीकरण करायचे आहेत, त्यापोटी चालकांना शासनाचा कर भरावा लागणार आहे. कराची ही रक्कम पाच हजारांपासून ते वीस हजारांपर्यंत जाते. त्यामुळे ते पुढे येत नाहीत. शासनाने भविष्यात परवाने खुले केले तर, ते मोफत मिळतात, मग आता पैसे कशाला भरायचे, असा ते विचार करीत आहेत. पण त्यावरही शासनाने शक्कल लढविली आहे. परवाने नूतनीकरणाची मुदत संपल्यानंतर दि. १६ ते २३ नोव्हेंबरपर्यंत परवाने रद्द करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. शासनाने नवीन परवाने सोडत पद्धतीने देण्याची घोषणा केली तर, ज्या चालकांनी नूतनीकरण करून घेतले नव्हते, त्यांना परवाना न देण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील अडीच हजार रिक्षांचे परवाने होणार रद्द!
By admin | Published: November 03, 2015 11:15 PM