संतोष भिसेसांगली : पुण्यातल्या रस्त्यांवर कंदील घेऊन निघालेल्या अंधाची गोष्ट बरीच प्रसिद्ध आहे. मी नेत्रहीन असलो तरी कंदीलामुळे इतरांना माझ्या अस्तित्वाची जाणिव व्हावी असा हेतू असल्याचे या अंधाचे स्पष्टीकरण होते. सांगली यशवंतनगरमधील दत्तनगरमध्ये राहणाऱ्या आनंदा लक्ष्मण शिंदे (वय ७३ ) यांनीही कोरोनामध्ये अशीच प्रेरणादायी भूमिका बजावली.शिंदे कोरोनाबाधित झाले, पण अंधपणामुळे इतरांपासून संपर्क टाळणे शंभर टक्के शक्य नव्हते. अजाणतेपेणी कोणीतरी संपर्कात यायचे. हे लक्षात घेऊन शेजाऱ्यापाजाऱ्यांना स्पष्टपणे कोरोनाबाधेची माहिती दिली. लपवून ठेवण्याने संसर्ग फैलावून अनेकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत, अशा काळात शिंदे यांनी स्वत:च इतरांना सावध केले.
गेली चाळीस वर्षे शिंदे कुटूंब यशवंतनगरमध्ये राहते. वसंतदादा कारखान्यातील ३६ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच देवीमुळे दृष्टीही गेली आहे. सध्या मधुमेहदेखील आहे. पत्नी रंजना (वय ६७) जन्मत:च दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत.११ मे रोजी दोघेही कोरोना पॉझिटीव्ह झाल्याचा रिपोर्ट आला. उघड्या डोळ्यांनी कोरोनाचा हाहाकार पाहणारे बाधित होताच हादरुन जातात, पण दृष्टी नसल्याने या हाहाकारापासून अज्ञानी असलेल्या शिंदे दांपत्याने सकारात्मक भावनेने कोरोना स्वीकारला. स्वत:पासून अंतर राखण्याची विनंती नातेवाईकांना व शेजाऱ्यांना केली. डॉक्टरांच्या सूचनांनुसार घरातच उपचार सुरु झाले. मुलगा संजय व सून वासंती देखभाल करायचे, पण दुर्दैवाने तेदेखील बाधित झाले.अशावेळी मदतीसाठी मित्र धावले. दैनंदिन वस्तू घरपोच दिल्या. माहेश्वरी युवा मंचानेही हात दिला. यादरम्यान मुलगा व सून कोरोनामुक्त झाले. शिंदे दांपत्यानेही मात केली.परस्परांना दिला विश्वासदिव्यांग शिंदे दांपत्याने परस्परांना विश्वास देत प्रकृती स्थिर ठेवली. अौषधयोजना, आहार, आरोग्यदायी जीवनशैलीचे डॉक्टरांच्या सूचनांनुसार काटेकोर पालन केले. महत्वाचे म्हणजे आत्मविश्वास हरवू दिला नाही. त्यामुळे दोन आठवड्यांच्या विलगीकरण काळात त्यांचा ऑक्सिजन स्थिर राहिला. दिव्यांगपणामुळे त्यांचे संपूर्ण सहजीवनच एकमेकांच्या मदतीने सुरु होते, कोरोनाकाळातही हातातला हात सुटू दिला नाही. हा विश्वास परस्परांचा प्राणवायू ठरला. कोरोनाने माघार घेतली.