सांगली : दिवाळी सणाच्या पाच दिवसांत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे निर्माण झालेले कागद, पूजा साहित्य, नारळाच्या झावळ्या, केळीचे खूट असा सुमारे दीडशे टन जादा कचरा वाढला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागातील साफसफाई कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कचऱ्यासोबतच या जादा कचऱ्याचीही विल्हेवाट लावली. महापालिकेचे शंभरहून अधिक कर्मचारी कचरा उठावाचे काम करीत होते. या कर्मचाऱ्यांची दिवाळी कचरा उचलण्यातच संपली. दिवाळीच्या पाच दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणात कचरा वाढतो. दिवाळीआधी घरे, दुकाने स्वच्छ केली जातात. त्यापाठोपाठ दिवाळीत खरेदीमुळे प्लॅस्टिक कॅरीबॅग व इतर वस्तूंचा कचरा वाढलेला असतो. दिवाळीच्या दिवसांत तर फटाक्यांच्या आतषबाजीने मोठ्या प्रमाणात फटाक्यांचे तुकडे, रिकामी खोकी रस्त्यावर पडलेली असतात. सणानिमित्त कापडपेठ, बालाजी चौक, मारुती रोड, मित्रमंडळ चौक, आदी रस्त्यावर विक्रेत्यांनी ठाण मांडलेले असते. अनेकदा विकला न गेलेला माल हे विक्रेते रस्त्यावरच टाकून जातात. त्यामुळे दिवाळीच्या सणात कचऱ्याचे प्रमाण वाढलेले असते. पाच दिवसांत महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी तब्बल दीडशे टन जादा कचरा उचलला आहे. पालिका हद्दीत दररोज ११० टन कचरा उठाव केला जातो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने जादा कर्मचारी नियुक्त करून शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे. सांगली शहरात ६० कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करीत होते. तीन कॉम्पॅक्टर, चार ट्रक, दोन डंपर प्लेसर यांच्या साहाय्याने कचरा समडोळी रस्त्यावरील डेपोवर नेण्यात येत होता. मिरज शहरातही चाळीसहून अधिक कर्मचारी सफाईच्या कामावर होते. सांगलीत शंभर टन, तर मिरजेत पन्नास टन जादा कचरा उठाव झाला आहे. (प्रतिनिधी)दंडात्मक कारवाईचा बडगारस्त्यावर कचरा करणाऱ्या अनेक नागरिकांना महापालिकेने दंड ठोठावला आहे. कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आले होते. नदीपात्रात साहित्य टाकणाऱ्या दहा नागरिकांवर दंडात्मक कारवाई केल्याचे स्वच्छता निरीक्षक आर. के. यादव यांनी सांगितले. कचऱ्याची आकडेवारीसोमवार : १२७ टनमंगळवार : ११५ टनबुधवार : १३० टनगुरुवार : १४० टनशुक्रवार : १२२ टनदररोज सरासरी : ११० टन
दिवाळीत वाढला दीडशे टन कचरा
By admin | Published: November 14, 2015 12:28 AM