सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्येच्या प्रकरणात, मुलीचा गर्भ आहे म्हणून डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या रुग्णालयात गर्भपात करणाऱ्या आठ जोडप्यांचे नमुने ‘डीएनए’ तपासणीसाठी पोलिसांनी घेतले होते. त्यांचा अहवाल पोलिसांच्या हाती आला आहे. यामध्ये स्त्री व पुरूष अशा दोन्ही गर्भांची हत्या करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात असल्याचे पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी बुधवारी सांगितले. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर खिद्रापुरेचे भ्रूणहत्येचे ‘रॅकेट’ उघडकीस आले होते. त्याने गर्भपात केलेले भ्रूण म्हैसाळ येथे ओढ्यालगतच पुरले होते. जेसीबीने खुदाई केल्यानंतर तब्बल १९ भ्रूण सापडले होते. या भ्रूणांचे अवशेष ‘डीएनए’ तपासणीसाठी यापूर्वीच पाठविले आहेत. पण ज्या महिलांचे गर्भपात केले होते; त्यांचेच हे भ्रूण आहेत का, याचा तपास करणे महत्त्वाचे होते. यासाठी पोलिसांनी गर्भपात केलेल्या महिलांचा शोध सुरू ठेवला आहे. गेल्या महिन्यात गर्भपात केलेल्या सात महिला व त्यांचे पती यांचा शोध घेतला होता. त्यांचे नमुने ‘डीएनए’ तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्याच्याकडे आॅपरेशन थिएटर चालविण्याचा परवाना होता, पण नर्सिंगचा परवाना नव्हता. त्यामुळे तो कसा काय उपचार करीत होता, याची चौकशी सुरू आहे. तपास अंतिम टप्प्यात आला असून या प्रकरणात आणखी काही डॉक्टरांचा समावेश आहे का, याचाही शोध सुरू आहे, असेही डॉ. काळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)निंबाळकर नियुक्तखिद्रापुरे याच्याकडून केवळ स्त्री गर्भाचीच नव्हे, तर पुरूष गर्भाचीही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. म्हैसाळ भ्रूणहत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून पुण्याचे अॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ. दीपाली काळे यांनी सांगितले.
डीएनएचा अहवाल पोलिसांच्या हाती
By admin | Published: April 26, 2017 11:47 PM