वाटेगाव/रेठरेधरण : चंद्रकांत पाटील, आपण कितीही मला पराभूत करण्याच्या वल्गना करा. मात्र जोपर्यंत माझ्यासोबत गोरगरीब, सामान्य माणूस व शेतकरी आहे, तोपर्यंत तुमच्यासारख्यांच्या वल्गनांना मी भीक घालत नाही, अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले.स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार खा. शेट्टी यांच्या प्रचारार्थ वाळवा तालुक्यात तांबवे, वाटेगाव, रेठरेधरण येथे प्रचार सभा झाल्या. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, विजय पाटील, अॅड. विश्वासराव पाटील, आनंदराव पाटील, सौ. सुस्मिता जाधव, सयाजी मोरे, संदीप राजोबा, भागवत जाधव, संजय पाटील होते.खा. शेट्टी म्हणाले, या मंडळींनी आपल्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी माझ्या नावाचाच माणूस उभा करून, त्याला माझे पूर्वीचे चिन्ह दिले आहे. मात्र लोक हुशार आहेत. ते माझा फोटो व बॅट हे चिन्ह शोधून मतदान करतील. माझी बॅट किती स्कोअर करते, हे तुम्हाला २३ तारखेला कळेल.यावेळी मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नेताजीराव पाटील, लिंबाजी पाटील, सुषमा भंडारे, अवधूत पाटील, तानाजी मोरे, अशोक मोरे, के. डी. शेळके, रामभाऊ माळी, पोपट जगताप, ब्रम्हानंद पाटील, शुभांगी पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होते.भामट्याचे गोडवेखा. शेट्टी यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा नामोल्लेख टाळून ‘एक भामटा’ असा उल्लेख केला. हा भामटा, हे सरकार शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणार असे म्हणत होता. मात्र तोच मंत्री झाल्यावर सरकारचे गोडवे गात फिरत आहे. मला सत्तेची हाव नाही. अन्यथा मीही सत्तेची ऊब खात बसलो असतो.
वल्गना करणाऱ्या चंद्रकांत पाटलांना भीक घालत नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 11:33 PM