लोकमत न्यूज नेटवर्क
शीतल पाटील /सांगली : सध्या ऑनलाइन आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यातही मोबाइलचा सर्रास वापर होतो. पण, अनेकदा नागरिकांना विविध आमिषे दाखवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे अनोळखी माणसांच्या हातात मोबाइल देऊ नका; अन्यथा क्षणात तुमचे बँक खाते साफ होऊ शकते. त्यासाठी सावधगिरी बाळगणे हाच एकमेव मार्ग आहे.
कोणत्याही बँकेकडून ग्राहकाला ओटीपी, केवायसीची मागणी केली जात नाही. तसे मेसेजही बँकांकडून ग्राहकांच्या मोबाइलवर पाठविले जात नाहीत. तरीही ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. अनोळखी व्यक्ती मोबाइल घेऊन क्षणात आपल्या बँक खात्यातील पैशांची अफरातफर करू शकते. त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे.
चौकट
- काॅल करण्यासाठी मोबाइल घेऊन -
अनोळखी व्यक्तीकडून काॅल करण्याच्या नावाखाली मोबाइल घेऊन ओटीपीद्वारे बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारला जाऊ शकतो.
- वेगळी लिंक पाठवून -
ग्राहकांच्या मोबाइलवर वेगळी लिंक पाठवून, आमिष दाखवून, ओटीपी मिळवून फसवणूक होऊ शकते.
- लाॅटरी लागली आहे, असे सांगून -
ग्राहकाला अमुक रकमेची लाॅटरी लागली आहे, असे सांगून त्याच्याकडून ओटीपीची मागणी होऊ शकते.
- केवायसीसाठी आवश्यक आहे, असे सांगून -
बँकेतून फोन केल्याचे सांगून केवायसी अपूर्ण असल्याची बतावणी करून ओटीपी मिळविला जाऊ शकतो.
चौकट
ही घ्या काळजी
१. बँक अथवा शासकीय कार्यालयाकडून कधीच ग्राहकांकडून ओटीपीची मागणी केली जात नाही. त्यामुळे ग्राहकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता ओटीपी शेअर करू नये.
२. मोबाइल आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. या लिंकवरून बँकेच्या रकमेवर डल्ला मारला जाऊ शकतो.
३. लाॅटरी अथवा कोणत्याही रकमेच्या आमिषाला बळी पडू नये. पैशाचे आमिष दाखवून ओटीपीची मागणी होऊ शकते.
चौकट
कोट
सोशल मीडिया आणि मोबाइलचा ओटीपी घेऊन फसवणूक केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. अनोळखी काॅल, माणसांना प्रतिसाद देऊ नये. मोबाइलचा गैरवापर होणार नाही, याबाबत सतर्क राहावे.
- संजय क्षीरसागर, साहाय्यक पोलीस निरीक्षक - सायबर विभाग