कवठेमहांकाळ : अग्रण नदी पात्रातील वाळू लिलावासाठी महसूल प्रशासनाच्या हालचालींना अग्रण धुळगावच्या ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. अथक प्रयत्नातून पुुनरुज्जीवीत केलेल्या अग्रणीला पुन्हा मारु नका अशी हाक त्यांनी दिला आहे. ठेक्यासाठी प्रांताधिकारी समीर शिंगटे व तहसीलदार बी. जे. गोरे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीत बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये वाळू लिलावाला तीव्र विरोध करण्यात आला.गेल्या जानेवारीमधील ग्रामसभेतही विरोधाचा ठराव केल्याची माहिती सरपंच शारदा भोसले यांनी दिली. सदस्यांनी सांगितले की, अग्रण नदीपात्रातून वाळू उपशाचा ठेका दिला तर गावाला उन्हाळ्यात पुन्हा तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागेल.
नदीपात्रातील पाणीपुरवठ्याच्या विहिरींत पाणी शिल्लक राहणार नाही, त्यामुळे डझनभर गावांना पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. बाळासाहेब भोसले यांनी सांगितले की, अग्रणीतील पाण्याच्या भरवश्यावर शेतीत पिकांची लागवड केली आहे, वाळू उपशामुळे शेती उध्वस्त होईल.अग्रणी पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवदास भोसले यांनी पाण्यासाठीची पूर्वीची भटकंती व पुनरुज्जीवनानंतर आताची सुखावह परिस्थिती प्रांताधिकारी शिगटे यांच्यासमोर मांडली. वाळू उपशामुळे अग्रणीचा आत्मा हरवेल असे सांगितले. वाळू उपशामुळे या गावांचे अर्थकारण मोडकळीस येण्याची भिती व्यक्त केली.प्रांताधिकारी शिंगटे म्हणाले की, ठेक्याच्या रकमेपैकी बहुतांश पैसे गावालाच मिळणार आहेत, त्यामुळे ग्रामसभेत पुनर्विचार करावा. बैठकीला अर्जुन भोसले, राजू हजारे, बाबासाहेब भोसले, जगन्नाथ कनप, भारत पाटील, कमलाकर देशमुख, बाळासाहेब भोसले, गफूर तांबोळी, पोलीस पाटील सुनील कुंभार, कुंडलिक रसाळे, भारत कोळी आदी उपस्थित होते.पंधरा वर्षे वाळू उपसा नाहीअग्रण धुळगाव ग्रामस्थांनी २००५ पासून नदीतून वाळू उपसा होऊ दिलेला नाही. प्रत्येक ग्रामसभेत उपशा विरोधात ठराव केला जातो. यावर्षी नदीत चांगले पाणी आल्याने प्रशासनाने पुन्हा उपशासाठी प्रयत्न सुुरु ठेवले आहेत.