श्रीनिवास नागेआठवडाभरात वेगवान घडामोडी घडत असताना प्रतीक पाटील यांनी कोल्हापुरात जाऊन दादांची भेट घेतल्याचं फारसं कोणाला समजलं नाही. कोल्हापूरच्या दादांचं आधीच काकांशी विळ्याभोपळ्याचं सख्य. दादांकडं दक्षिण महाराष्टची जबाबदारी. एकीकडं ते पक्षाचे मोहरे वाढवत असताना, काका मात्र आपल्याच गटाला वाढवत होते. मंत्री असूनही काका त्यांना जुमानत नव्हते. (आताही फार ऐकतात, असं नाही!) त्यामुळं मग दादांनी पद्धतशीर पावलं टाकली. काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या वसंतदादा गटाच्या प्रतीक आणि विशाल पाटील यांना भाजपच्या गळाला लावण्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या. पण ते जमलं नाही. अखेर संधी आलीच. आता विशाल पाटील यांनी काकांविरुद्ध शड्डू ठोकलाय. त्यांना कोल्हापूरच्या दादांची रसद मिळणार, अशी कुजबूज भाजपेयींमध्ये कालपासून सुरू झालीय.भाजपमधल्या खासदार संजयकाका पाटील यांच्या कंपूला ज्याची भीती होती, तेच घडतंय जणू. विरोधात कुणीही उतरलं तरी चालेल, पण विशाल पाटील नकोत, असं या कंपूला वाटत होतं. त्यासाठी बुवा-महाराजांना साकडं घातलं गेलं. कौल लावला गेला. अंगारे-धुपारे झाले. पण सगळं मुसळ केरात! त्यामुळं या कंपूच्या कपाळावर आठ्यांचं जाळं दिसायला लागलंय. निवडणुकीच्या यंत्रणेची तयारी करायची की, विरोधी गोटातल्या बातम्या काढायच्या, हेच या कंपूला कळेना.दुसरीकडं भाजपमधल्याच आमदार-नामदार गटांना आयती संधी चालून आलीय. काँग्रेस-राष्टÑवादीच्याच बाळगुटीवर वाढलेल्या आणि गेल्या पाच वर्षांत कमळाला जवळ केलेल्यांना काकांचे पुरेपूर उट्टे काढायला मिळणार आहेत. पक्षात राहून पक्षाच्याच उमेदवाराचा थंड डोक्यानं ‘करेक्ट कार्यक्रम’ कसा करायचा, याचं बाळकडू त्यांना आधीच मिळालंय.भाजपमधली गटबाजी संपली, आता सगळ्यांनी पक्षासाठी एकत्र यायचं, असा सूर दिवसा आळवला जात असला तरी, काकांना हिसका कसा दाखवायचा, हिशेब पूर्ण कसा करायचा, याची गणितं रात्री मांडली जाताहेत.
पाच वर्षांपूर्वी भाजपच्या तंबूत शिरलेल्या उंटानं नंतर तंबूच पळवल्याचं चित्र तयार झालं होतं. खरं तर भाजपेयींच्या रणनीतीनुसार त्या तंबूच्या दोऱ्या सैल सोडल्या होत्या, उंटाला आत येता यावं म्हणून! आता त्या आवळण्याची संधी मिळालीय. शिरलेल्या उंटानं कितीही दुगाण्या झाडल्या तरी त्याला पळता येणार नाही, असं आवळणं सुरू झालंय. लोकसभा निवडणुकीनं हा करिष्मा घडवलाय. मंगळवारी जतमध्ये झालेल्या भाजपच्याच दोन बैठकांनी त्याची झलक दाखवलीय. ‘आगे आगे देखो, होता हैं क्या’, असे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागलेत!
मूळ भाजपमधल्या निष्ठावानांना काकांनी आधीच दुखवून ठेवलंय. कोणत्याही निर्णयात विचारात घेणं राहिलं बाजूला, त्यांची अवहेलनाच कशी होईल, हे कटाक्षानं पाहिलं! (मकरंद देशपांडेंना याचा अनुभव जरा जादाच असावा!) जवळच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा काकांना कधीच पूर्ण करता आल्या नाहीत. गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे ही त्याची ठसठशीत उदाहरणं. काकांनी दोघांना महामंडळाची केवळ गाजरं दाखवली. पडळकरांनी तर शेवटी पक्षाला रामराम ठोकून काकांच्या करतुतीवर तोफ डागली. मागील महिन्यात डोंगरेंच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर लागलेल्या डिजिटल बोर्डांवर डोंगरे-पडळकर यांचे एकत्रित फोटो झळकले. त्यावरून काका गायब झाले होते!
आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांचं खच्चीकरणच करण्यावर काकांचं जातीनं लक्ष असतं! सिव्हिल हॉस्पिटलच्या नूतनीकरणासाठी निधी आणला गाडगीळांनी, पण त्यांना श्रेय न देता त्या नूतनीकरणाच्या कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्याहस्ते परस्पर तासगावात उरकलं गेलं. यामुळं गाडगीळ काकांवर खार खाऊन आहेत. सुरेश खाडेंचा तर काकांशी छत्तीसचा आकडा. मिरज मतदारसंघात खाडेंच्या विरोधकांना काका गोंजारतात, फूस लावतात, हे लपून राहिलेलं नाही. त्यातच खाडेंच्या मंत्रीपदामध्ये काकांनी आडकाठी घातल्याचं जगजाहीर झालं. (गोपीचंद पडळकरांनीच त्याचा गौप्यस्फोट केला.) खाडेंना डावलून काकांनी स्वत:चा गट उभा केलाय. खाडेंची ही नाराजी काढणं आता मुश्कीलच! म्हणूनच खाडे आता काकांच्या कार्यक्रमात तोंडदेखलं बोलून निघून जातात.
जतमध्ये काकांच्या करणीनं भाजपचे आमदार विलासराव जगताप यांच्यासमोर भाजपचाच दुसरा गट उभा ठाकलाय. ‘अपना टाईम आयेगा’ म्हणणाऱ्या या गटाला जिल्हाभरातनं बळ मिळतंय. आता त्यांच्या नाकदुºया काढायची वेळ काकांवर आलीय. तासगाव-कवठ्यात अजितराव घोरपडे तर हत्यारं परजूनच बसलेत. लोकसभेच्या मैदानात उतरण्यापासून ते थांबले असले तरी, विधानसभा निवडणुकीपासूनचा हिशेब पूर्ण करण्याचा चंग त्यांनी बांधलाय.
खानापूर-आटपाडीत आमदार अनिल बाबर आणि काकांमध्ये दिलजमाई झाल्याचं कित्येकदा सांगितलं गेलं, पण मनं जुळलीच नव्हती, तर दिलजमाई कुठली? नागेवाडीच्या यशवंत कारखान्यापासूनचा त्यांच्यातला जुना वाद कधी शमलाच नाही. त्यातच काकांनी नेहमीच बाबरांचे विरोधक सदाभाऊंशी ‘दोस्ताना’ सांभाळलेला. परिणामी बाबर या निवडणुकीची वाटच पहात असावेत..!
भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांशी काकांनी वालचंद महाविद्यालयाच्या मालकी प्रकरणापासून पंगा घेतलाय. देशमुख-काका गटातला उभा दावा सगळ्या जिल्ह्यानं पाहिलाय आणि आताही पाहतोय. स्वत:च्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षाला पाण्यात पाहणाºया काकांना देशमुखांचं ‘पाणी’ दाखवणारच, असं पलूस-कडेगावात बोललं जातंय... काकांचा प्रचार करणार नाही, असं मुंबईत जाऊन सांगणारे देशमुख आता काकांच्या प्रचारात आहेत खरे, पण...जाता-जाता : गुरुवारी म्हणे औदुंबरच्या डोहात भाजपमधले सगळे मतभेद बुडवले जाणार आहेत. गेल्या पन्नास वर्षांत जिल्ह्यातल्या नेत्यांमधले मतभेद बुडवण्यासाठी औदुंबरचाच डोह वापरला गेलाय... नेते बुडाले, पण मतभेद बुडाले नाहीत!यंदा कोण बुडणार?