सांगली : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात परदेश वारी करून आलेल्या प्रवाशांना निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आलेले आहे. जर एखादा प्रवाशी कसूर करत असेल तर त्यांना सक्तीने प्रशासनाने तजवीज केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
118 प्रवाशांना त्यांच्याच घरी निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आलेले आहे. त्यांनी निरीक्षण कालावधी पूर्ण होईपर्यंत घराबाहेर पडू नये. याबाबतची आवश्यक ती खबरदारी स्वत: संबंधित व्यक्तीने व त्यांच्या कुटुंबाने घ्यावी. या प्रवाशांचे होम क्वारंटाईन परिणामकारक व्हावे यासाठी आरोग्य विभागाबरोबरच पोलीस विभागाचीही मदत घेण्यात येत आहे.करोनाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी धार्मिक स्थळांवर धार्मिक पूजा व विधीवत कार्यक्रम करण्यासाठी कोणतीही बंदी नाही पण भाविकांची गर्दी होणार नाही याची व स्वच्छतेबाबतची आवश्यक ती खबरदारी संबंधित ट्रस्टी व संयोजक यांनी घ्यावी, असे स्पष्ट केले.जनावरांचे आठवडा बाजार 31 मार्च पर्यंत बंदकरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जनावरांचे आठवडा बाजार 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोणत्याही औद्यिगिक आस्थापनांवर बंदी नसल्याचेही स्पष्ट केले.आणखी दोन प्रवाशांचे स्वॅब निगेटिव्हयापूर्वी तपासणी करण्यात आलेल्या 6 प्रवाशांचे घशातील स्वॅब निगेटिव्ह आले असून दिनांक 14 मार्च रोजी ज्या दोन प्रवाशांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यांचा अहवालही निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट करून सद्या दोन प्रवाशी भारती हॉस्पीटल व सिव्हील हॉस्पीटल यामध्ये प्रत्येकी एक या प्रमाणे आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, अनावश्यक गर्दी टाळा, स्वच्छतेबाबत योग्य ती खबरदारी घ्या, असेही नागरिकांना आवाहन केले. उपाययोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीचे यंत्रणांना सक्त निर्देशकरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीतही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्देशित केलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी असे सांगून यामध्ये कसूर झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद केल्या असल्या तरी तिथल्या बालकांचे पोषण आहाराचे नुकसान होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व शाळा महाविद्यालये, व्यवसाय प्रशिक्षण केंद्र 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. तरी शिक्षकांनी मुख्यालयी हजर राहून शैक्षणिकपूरक कामे करावीत व आपल्या विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.हॉटेल, लॉज, खाद्य पदार्थ विक्रेते यांनी करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची व घ्यावयाच्या खबरदारीची आवश्यक जनजागृती करावी, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, खाजगी क्लासेस पूर्णत: बंद राहतील याबाबतही संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट केले.
याबरोबरच प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सर्व निर्देशांचे पालन सर्व संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांच्यासह सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.