सांगली : अन्य सर्वांचे आरक्षण सुरक्षित राहून मराठ्यांनाही मिळाले पाहिजे अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे नेत्यांनी आरक्षणाच्या विषयावर चिथावणीखोर वक्तव्ये करू नयेत, असा इशारा पक्षाच्या कोअर समितीच्या बैठकीत देण्यात आला. सांगलीत सोमवारी बैठक झाली. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, निशिकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे, पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप, मोहन वनखंडे आदी उपस्थित होते.मकरंद देशपांडे म्हणाले, मराठ्यांना यापूर्वीही आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मिळाले होते. आतादेखील तेच देतील हे निश्चित आहे. ओबीसी किंवा अन्य कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण मिळावे ही पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे कोणीही आरक्षणाविषयी चिथावणीखोर किंवा पक्षाच्या धोरणाशी विसंगत वक्तव्ये करू नयेत. सामाजिक तेढ निर्माण होईल अशी भूमिका घेऊ नये. पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीसह विविध समित्या ५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना देशपांडे यांनी केली. लोकसभा निवडणुका १०० दिवसांवर आल्याच्या पार्श्वभूमीवर तयारीची सूचना करण्यात आली.काँग्रेस किंवा शरद पवार हे सत्तेत नसतात, तेव्हा सामाजिक वातावरण दूषित होईल अशी भूमिका घेतात, असाही आरोप बैठकीत झाला. राम मंदिरात जानेवारीमध्ये रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा उत्सव जिल्हाभरात साजरा करण्याचे ठरले. यानिमित्त धार्मिक कार्यक्रम, मंदिरांची स्वच्छता, जीर्णोद्धार आदी उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला.
जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे सिंचन योजनांचा पाणीपुरवठा अखंडित राहील याची दक्षता पालकमंत्री व खासदारांनी घेण्याची विनंती करण्यात आली. यावेळी पृथ्वीराज पवार, दीपक शिंदे-म्हैसाळकर, सत्यजित देशमुख हेदेखील उपस्थित होते. शेखर इनामदार सलग दुसऱ्या बैठकीला गैरहजर होते.मोहन भागवत सांगलीतदरम्यान, येत्या १७ डिसेंबरला सरसंघचालक मोहन भागवत सांगलीत येणार आहेत. टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी वर्षाचा शुभारंभ त्यांच्याहस्ते होईल. कार्यक्रमानंतर सकाळी संघ कार्यकर्त्यांची बैठक व दुपारी पाच वाजता चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर व्याख्यान असा कार्यक्रम होणार आहे. २५ डिसेंबरला अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती जिल्हाभरात व्यापक प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय झाला.