सांगली : अनिकेत कोथळे याच्या पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजण सीआयडीला तपासात कोणतेही सहकार्य करीत नसल्याचे चित्र आहे. सीआयडीच्या अधिकाºयांनी विचारलेल्या प्रश्नांना ते ‘माहिती नाही’ एवढेच उत्तर देत आहेत. पोलीस कोठडीची हवा खाणाºया कामटेने ‘मला सरकारी जेवण नको, घरचे जेवण पाहिजे, असे म्हणून शनिवारी धिंगाणा घातला. दरम्यान, लकी बॅग्ज या दुकानाचा मालक नीलेश खत्री याचीही शनिवारी रात्री चौकशी करण्यात आली.
कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यांना लुबाडल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना गेल्या सोमवारी सांगली शहर पोलिसांनी अटक केली होती. गुन्हे कबूल करण्यासाठी निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व ‘झिरो’ पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी ‘थर्डडिग्री’चा वापर करुन अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जंगलात जाळण्यात आला होता. राज्यात अशाप्रकारची ही पहिलीच घटना घडल्याने खळबळ माजली आहे. हा तपास सीआयडीकडे गेला आहे.
घटनेची माहिती व तपासाबाबत सूचना करण्यासाठी अप्पर पोलिस महासंचालक संजयकुमार वर्मा शुक्रवारी रात्री उशिरा सांगलीत दाखल झाले. त्यांच्यासोबत अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी होते. पोलिस मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये वर्मा थांबले होते. रात्री दीड वाजता निलंबित उपनिरीक्षक युवराज कामटे याला त्यांच्यासमोर हजर करण्यात आले. वर्मा यांनी अर्धा तास कामटेची कसून चौकशी केली. त्यानंतर कामटेला तेथून विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या कोठडीत नेण्यात आले.
शनिवारी सकाळी अकरा वाजता कामटेला बुरखा घालून पुन्हा सीआयडी पथकासमोर हजर करण्यात आले. बारा वाजता ‘झिरो’ पोलिस झाकीर पट्टेवाले यालाही बुरखा घालून आणले. त्यापाठोपाठ अनिल लाड, अरुण टोणे, सूरज मुल्ला, राहुल शिंगटे यांनाही बुरखा घालून आणण्यात आले होते. सर्वांना स्वतंत्र खोलीत बसविण्यात आले होते. तासाभराच्या चौकशीनंतर झाकीर पट्टेवालेस तेथून नेण्यात आले. कामटेसह पाचजणांची दिवसभर वर्मा यांच्यासमोर चौकशी सुरू होती. या दरम्यान कामटेने चौकशीत कोणतेही सहकार्य केले नाही.मोबाईल जप्तकवलापूरच्या संतोष गायकवाड यांना चाकूच्या धाकाने दोन हजारांची रोकड व मोबाईल काढून घेतल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली होती. हा मोबाईल त्यांनी एकाला विकला होता. तो मोबाईल संबंधितांकडून पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच लुबाडल्याची घटना खरी आहे. फिर्यादी गायकवाड कवलापूरचे आहेत. सीआयडीने त्यांनाही चौकशीसाठी पाचारण केले आहे.
कामटेची मुजोरीकामटेला पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. तिथे तो सरकारी जेवण घेण्यास नकार देत आहे. विश्रामबाग ठाण्यात शनिवारी त्याने कोठडीच्या दरवाजाचे बार जोरजोराने हलवून ‘मला सरकारी नको, घरचे जेवण द्या’, असे म्हणून धिंगाणा घातला. पण अधिकाºयांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
बॅग व्यापाºयाकडे चौकशीअनिकेत कोथळे हा बॅग व्यापारी नीलेश खत्री याच्याकडे कामाला होता. पगारावरुन अनिकेतचा खत्रीशी वाद झाला होता. यातून खत्रीने कामटेमार्फत त्याचा ‘काटा’ काढल्याचा आरोप कोथळे कुटुंबाने केला होता. त्यामुळे खत्रीला शनिवारी सीआयडीने चौकशीसाठी बोलाविले होते. तासभर चौकशी करुन त्याचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर त्याला सोडून दिले.लोहाना न बोलावता बैठकीलागिरीश लोहाना हा नुकत्याच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित होता. त्याबद्दल सर्वपक्षीय समितीने स्पष्टीकरण दिले आहे की, त्याला बैठकीसाठी कुणीही बोलावले नव्हते. त्याचा आणि सर्वपक्षीय समितीचा काहीही संबंध नाही. त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी.