सांगली : महापालिकेतील बोंबाबोंबच प्रसारमाध्यमातून अधिक येते. चांगली कामे जनतेपर्यंत गेली पाहिजेत, अशा शब्दात सोमवारी काँग्रेस नेते आमदार पतंगराव कदम यांनी महापौर व गटनेत्यांना कानपिचक्या दिल्या. ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम मेअखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर सांगली व कुपवाड या दोन शहरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. कदम यांनी सोमवारी माळबंगला येथील ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, आयुक्त रवींद्र खेबूडकर, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक प्रदीप पाटील, विशाल कलकुटगी होते. पाणीपुरवठा अभियंता शरद सागरे यांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाची माहिती दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना डॉ. कदम यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर टोलेबाजी केली. सांगलीचे लोक जगतात कसे? असा सवाल करून शेरीनाल्याच्या प्रश्नाला हात घातला. गेली ४० वर्षे शेरीनाल्याचा प्रश्न ऐकतोय. पण अजून तो सुटलेला नाही. शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत मिसळते. तेच पाणी सांगली व कुपवाडला मिळते. पण आता हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघेल.महापालिकेने ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्णत्वास आणले आहे. मेअखेरीपर्यंत काम पूर्ण होऊन सांगलीकरांना शुद्ध पाणीपुरवठा होईल. काँग्रेसच्यादृष्टीने ही फार महत्त्वाची योजना आहे. आजच सकाळी आयुक्तांशी विकास कामावर चर्चा केली आहे. लवकरच अनेक कामे मार्गी लागतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यावर किशोर जामदार व हारुण शिकलगार यांनी पालिकेकडून मंजूर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाची माहिती दिली. त्यावर महापालिकेतील बोंबाबोंबच अधिक बाहेर येते. चांगली कामे जनतेसमोर गेली पाहिजेत, अशा शब्दात त्यांनी कानपिचक्याही दिल्या. जलशुद्धीकरण केंद्राच्या ठेकेदाराला दर्जेदार व चांगले काम करण्याची सूचनाही त्यांनी केली. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांना आपण सांगली महापालिकेत आणले, असे सांगत महापालिकेचा कारभार स्वच्छ व पारदर्शी व्हावा आणि सर्व नगरसेवकांना न्याय मिळावा, अशी अपेक्षाही डॉ. कदम यांनी आयुक्तांकडून व्यक्त केली. (प्रतिनिधी)
बोंबाबोंब नको, चांगली कामे जनतेपर्यंत पोहोचवा
By admin | Published: April 24, 2017 11:41 PM