मिरज : मिरजेत सुंदरनगर येथे चोरट्यांनी बंगला फोडून ऐवज लंपास केला. चोरट्यांनी सुंदरनगर परिसरात वारंवार घरफोड्या करून पोलीस यंत्रणेला आव्हान दिले आहे. चोऱ्या व घरफोड्याचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांत घबराट आहे. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी सुंदरनगर येथील दंतरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण डोर्ले यांच्या ‘अश्मी’ या बंगल्याच्या दरवाजाची कुलपे कटावणीने उचकटली. बंगल्यातील मौल्यवान ऐवजाच्या शोधात कपाट व बेडरूममधील साहित्य विस्कटले. बंगल्यातील ऐवज घेऊन चोरट्यांनी पलायन केले. आज सकाळी बंगल्याचा दरवाजा उघडा दिसल्याने चोरीबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. चोरीबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की व पोलीस फौजफाटा घटनास्थळी आला. चोरट्यांनी घरातील मुख्य दरवाजा व पहिल्या मजल्यावरील गच्चीच्या दरवाजाचे कुलूप कटावणीने उचकटले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक आणण्यात आले. श्वानपथकाने सुंदरनगरजवळ असलेल्या खासबाग दर्ग्यापर्यंत चोरट्यांचा माग काढला. तेथून चोरटे वाहनाने पसार झाल्याचा अंदाज आहे. डॉ. प्रवीण डोर्ले कुटंबियांसह पुणे येथे गेले आहेत. डॉ. डोर्ले परगावी असल्याने घरातील किती ऐवज चोरीला गेला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसात तक्रार दाखल नसल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर) चौदा बंगले फोडले विस्तारित भागातील सुंदरनगर येथे वारंवार घरफोड्या होत असल्याने रखवालदाराची नियुक्ती केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना केल्या होत्या. चोरांना प्रतिबंध करण्यासाठी तात्पुरती पोलीस चौकी स्थापन केली होती. मात्र या सर्व उपाययोजना व्यर्थ ठरल्या आहेत. चोरट्यांनी येथे तब्बल १४ वेळा बंगले फोडले आहेत. आज पुन्हा बंगला फोडण्यात आला आहे.
मिरजेत डॉक्टरांचा बंगला फोडला
By admin | Published: January 31, 2016 12:25 AM