लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : जिल्ह्यातील कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या मिरजेतील अनेक डाॅक्टरांना संसर्ग सुरूच आहे. मिरजेतील बालरोगतज्ज्ञ डाॅ. राजेश शहा (५३) यांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. कोरोनामुळे मिरजेत वर्षभरात तीन डाॅक्टरांसह अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे.
गतवर्षीपासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. मिरजेतील वैद्यकीय क्षेत्रही कोरोनामुळे अडचणीत आले आहे. मिरजेतील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार करताना डाॅक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही प्राण गमवावे लागत आहेत. गतवर्षी एप्रिल व मे महिन्यात बंद असलेली खासगी रुग्णालये प्रशासनाने कारवाईचा पवित्रा घेतल्याने पुन्हा सुरू झाली. कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने मिरजेतील अनेक खासगी रुग्णालय चालकांना कोविड रुग्णालयात उपचाराची ड्युटी देण्यात आली. उपचार करताना मिरजेतील अनेक डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाला तोंड द्यावे लागत आहे. वर्षभरात अनेक डाॅक्टरांनी कोरोनावर मात केली. मात्र काही जणांचा मृत्यू अस्वस्थ करणारा आहे. गतवर्षी मिरज शासकीय कोविड रुग्णालयातील शंभरावर डाॅक्टर, परिचारिका व कर्मचारी संक्रमित झाले होते. यावर्षी डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या लसीकरणामुळे संक्रमणाचे प्रमाण कमी आहे. मात्र लसीकरण, फेसशिल्ड, मास्क, पीपीई किट, ग्लोव्हज यासह सुरक्षा साधनांचा वापर करूनही कोरोनाचा संसर्ग सुरूच असल्याने मिरजेतील वैद्यकीय क्षेत्राला फटका बसत आहे.
वर्षभरात वाॅन्लेसचे माजी संचालक भूलरोगतज्ज्ञ डाॅ. अरुण फणसोपकर, जनरल प्रॅक्टीशनर डाॅ. एस. बी. झरे व आता बालरोग तज्ज्ञ डाॅ. राजेश शहा यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन वेळा लसीकरणानंतरही डाॅ. राजेश शहा यांना कोरोनाची लागण झाल्याने अत्यवस्थ अवस्थेत त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी त्यांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत होती.
चाैकट
काेराेनाचा सामना करीत अविरत रुग्णसेवा
वैद्यकीय पंढरी असा लौकिक असलेल्या मिरजेत डाॅक्टर मंडळी जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करीत आहेत. मिरजेत जिल्ह्यासह कर्नाटकातून दररोज कोविड रुग्ण उपचारासाठी येत आहेत. विविध शस्त्रक्रिया, अवयवरोपण, पेशीरोपण, सांधेरोपण, यासह उपचार व तपासणी सुविधांमुळे मिरजेतील वैद्यकीय क्षेत्राची ख्याती आहे. कोरोना संसर्गाचा सामना करीत मिरजेत कोविड रुग्णालयांत रुग्णसेवा सुरू आहे.
चाैकट
आर्थिक संरक्षणाची गरज
कोरोना रुग्णसेवा करणारे खासगी डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शासनाकडून आर्थिक संरक्षण आवश्यक असल्याचे मिरज आयएमएचे अध्यक्ष डाॅ. अजितसिंह चढ्ढा यांनी सांगितले.