सांगली : कोरोनाचा कहर अनुभवलेल्या जिल्ह्यातील कोरोनास्थिती सध्या स्थिर असली तरी अद्यापही चिंताजनक परिस्थिती कायम आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना कालावधीत जोखीम पत्करून सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे आता डॉक्टरांचे काम तणावपूर्ण बनले असले तरी आहार, व्यायाम व पुरेशा विश्रांतीस प्राधान्य देऊन ‘फिट अँड फाइन’ राहण्याकडे डॉक्टरांचे प्राधान्य आहे.
कोरोनाची दुसरी लाट अनुभवणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ताण व कामही वाढल्याने शासकीय रुग्णालयातील डॉक्टर सध्या व्यस्त राहत आहेत. दररोज संसर्गाचा होणारा धोका सांभाळून सेवा देण्यात डॉक्टर कार्यरत राहिले आहेत. त्यामुळे कोराेना कालावधीत डॉक्टरांचे वजनही घटल्याचे चित्र आहे.
चौकट
आहाराबाबत घेतात काळजी
१) कोरोना कालावधीतील काम वाढल्याने डॉक्टरांचे जेवणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांनी अधिक प्रथिने असलेल्या आहाराला प्राधान्य दिले आहे.
२) आहाराबरोबरच अनेक डॉक्टर सध्या घरीच ट्रेड मिलसह इतर उपकरणांच्या मदतीने व्यायाम करीत आहेत.
३) अनेकदा ड्यूटीच्या वेळा निश्चित नसल्याने डॉक्टर रुग्णालयात येताना डबा घेऊन येतात, त्यात प्रामुख्याने सलाड, अंडी, दूध यांचा समावेश असतो.
चौकट
धावपळीमुळे शारीरिक ताण वाढला
* गेल्या वर्षीपेक्षाही यंदा कोरोनाची स्थिती अधिक गंभीर आहे. त्यात पुन्हा तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना स्वत:चे आरोग्य सांभाळण्याचे आव्हान पेलावे लागत आहे. संसर्ग होणार नाही यासाठी डॉक्टरांचे विशेष प्रयत्न असतात.
कोट
जिल्हा रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार होत असले तरी प्रशासकीय कामकाज व रुग्णांवर उपचारांंचे काम करताना ताण येतो. त्यासाठी नियमित व्यायामावर भर दिला आहे. प्रशासकीय कामामुळे व्यस्त राहावे लागत असले तरी सकस आहार व व्यायामाला प्राधान्य दिले आहे.
डॉ. नंदकुमार गायकवाड, अधीक्षक, शासकीय रुग्णालय
कोट
रुग्णालयातील काम वाढले असले तरी रुग्णसेवेस प्राधान्य देण्यात येत आहे. आवश्यक ती खबरदारी घेऊनच रुग्णसेवा दिली जात आहे. दररोज योगा, नियमित व्यायाम सुरूच ठेवला आहे.
डॉ. सुबोध उगाणे
कोट
सध्या हेवी वर्कआऊट बंद केले असले तरी नियमित इतर व्यायाम सुरू आहे. योगा, चालणे वाढविले आहे. सेवेत असताना पाणी पिण्यास अडचणी असतात, त्यामुळे जमेल तेव्हा अधिक पाणी पीत असतो. वेळेवर जेवण व झोपेसाठी प्रयत्न करीत असलो तरी कामामुळे ते शक्य होत नाही. तरीही आरोग्याची काळजी घेतली जात आहे.
डॉ. संतोष दळवी
चौकट
शासकीय रुग्णालय २
डॉक्टरांची संख्या
आरोग्य कर्मचारी ६०१