सांगली : जिल्ह्यात आतापर्यंत १९ लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. अजूनही लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी आहे. त्यात गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत पुढाऱ्यांची लसीकरण मोहिमेत लुडबूड सुरू असते. वशिलेबाजीमुळे अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना लसीसाठी ताटकळत थांबावे लागते. दमदाटीचे किरकोळ प्रकारही घडले आहेत.
जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. पण, एप्रिलपासून खऱ्या अर्थाने या मोहिमेला गती आली. आतापर्यंत ७१ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात ४५ वर्षांवरील नागरिकांनी सर्वाधिक लस देण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी आरोग्य केंद्रावर अनेक ठिकाणी वशिलेबाजीही केली जात आहे. गावपुढाऱ्यांकडून शिफारस घेऊन येणाऱ्या लोकांना तातडीने लस दिली जात असल्याचे प्रकारही घडत आहेत.
चौकट
पहिला डोस : १३४८४८२
दुसरा डोस : ५४७७७३
चौकट
ही घ्या उदाहरणे
१. शहरातील एका आरोग्य केंद्रात वृद्ध महिलेला लस मिळत नव्हती. लस संपल्याचे सांगण्यात आले होते. या भागातील पुढाऱ्याने तातडीने तिथे धाव घेतली. कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर वृद्ध महिलेला लस मिळाली.
२. कर्नाटक, कोल्हापूर या जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून मिरज पूर्व भागातील आरोग्य केंद्रावर लसीसाठी येत होते. त्यामुळे स्थानिकांना लस मिळत नव्हती. त्यामुळे पूर्व भागातील तरुणांनी जिल्ह्याबाहेरील नागरिकांना अडविले होते.
३. मिरजेतील एक आरोग्य केंद्रावर नगरसेवकाने चिठ्ठी घेऊन पाठविलेल्या नागरिकांना आधी लस दिली जावी, यासाठी कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा प्रकार घडला होता.
चौकट
वीस हजार डोस शिल्लक
१. जिल्ह्यात सोमवारी २० हजार लसीचे डोस शिल्लक होते.
२. शासनाकडून मिळणाऱ्या लसीचे दररोज जिल्हा व शहरात वाटप केले जाते. वाटप केलेली लस दोन दिवसांत संपविली जाते.
३. आरोग्य केंद्रावर ऑनलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांना प्राधान्य दिले जात असले, तरी प्रत्यक्षात केंद्रावर येणाऱ्या नागरिकांनाही लस दिली जात आहे.
चौकट
दमदाटी, शिवीगाळीचा प्रकार नाही
जिल्ह्यात लसीकरण मोहिमेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले आहे. जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना कुठेही दमदाटी, शिवीगाळीचा प्रकार घडलेला नाही. लसीच्या पुरवठ्याबाबत मात्र नागरिकांना वारंवार विचारणा होत होती. पण, त्यांची समजूत काढल्यानंतर नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतली. - डाॅ. विवेक पाटील, लसीकरण विभागप्रमुख