जत : येथील शहीद अंकुश सोलनकर चौकालगत असलेल्या डॉ. श्रीनिवास पांडुरंग माने (वय ३२, रा. माने हॉस्पिटल, जत-विजापूर रोड, बसवेश्वर चौक, जत) यांनी रुग्णालयातील पंख्याला बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही. घटना शुक्रवारी सायंकाळी सव्वाचार वाजता घडली. या घटनेमुळे जत शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
श्रीनिवास माने स्त्रीरोगतज्ज्ञ होते. त्यांनी एम.डी. पदवी प्राप्त केली होती. जत शहरातून जाणाऱ्यां विजापूर-गुहागर राज्यमार्गावर सोलनकर चौकालगत त्यांनी चार महिन्यांपूर्वीच स्वतंत्र रुग्णालय सुरु केले होते. त्यांचे वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्यांना अद्याप मूलबाळ नव्हते. त्यांची पत्नीही डॉक्टर आहे. दोघे मिळून हे रुग्णालय चालवत होते.
तीन वाजण्याच्या दरम्यान त्यांची पत्नी घरी गेली. त्यानंतर रुग्णालयात औषध दुकान चालवत असलेले त्यांचे भाऊ श्रीकांत यांना, मी विश्रांती घेत आहे, पेशंट आल्यानंतर मला उठवायला ये, असे सांगून सोलनकर वरील मजल्यावर गेले होते.
चार वाजण्याच्या दरम्यान पेशंट आल्यानंतर श्रीकांत हे श्रीनिवास यांना बोलावण्यासाठी गेले असता, पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह दिसून आला. येळवी (ता. जत) येथे रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपचे ज्येष्ठ नेते व डफळे साखर कारखान्याचे माजी संचालक आर. के. माने यांचे ते पुतणे होत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.