पुनवत : ग्रामीण भागात यात्रा, उरूस व राजकीय नेत्यांचे वाढदिवस, जयंतीनिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पण सध्याच्या काळात या अशा कार्यक्रमांमध्ये आता श्वान स्पर्धाचेही आयोजन करण्यात येत आहे. किमती श्वानांच्या धावण्याच्या स्पर्धेचे आता ठीक ठिकाणी होत आहेत. शिराळाखुर्द (ता. शिराळा) येथे आयोजित श्वानांच्या स्पर्धेस शौकिनांमधून मोठा प्रतिसादही मिळाला. यासाठी ५० हजारांपर्यंत बक्षीस देण्यात येत आहे. श्वासन स्पर्धेस मिळणाऱ्या प्रतिसादावरून, या स्पर्धेचे महत्त्व वाढत असल्याचेही दिसू लागले आहे. स्पर्धेच्यानिमित्ताने पंधरा हजार ते दीड लाखापर्यंतच्या रकमेस श्वानांची खरेदी केली जात आहे. यामध्ये क्रॉस ग्रॅहून व महाराष्ट्र ग्रॅहून या जातींच्या श्वानांचा समावेश आहे. हे श्वान फक्त पळण्याच्या स्पर्धेसाठीच पाळले जात आहे.श्वानांचे मालक एकेका श्वानासाठी महिन्याकाठी दोन ते अडीच हजारापर्यंत खर्च करीत आहेत. दररोज आंघोळ घालणे, त्यांना खाण्यासाठी दूध, तूप, फळांचा रस, अंडी, मटण असा पोषक खुराकही स्पर्धेतील श्वानांना दिला जात आहे. खाण्याबरोबरच त्यांचे आरोग्य व औषधोपचारासाठी मोठा खर्च के ला जात असल्याचे श्वान मालकांकडून सांगण्यात येत आहे.स्पर्धेच्या ठिकाणी एक विशिष्ट धावणमार्ग बनवला जातो. स्पर्धेसाठी येणाऱ्या श्वानांना वाहनातून आणले जाते व स्पर्धा सुरू होण्याआधी त्यांच्यासाठी गाद्याही अंथरल्या जातात. हजार फुटाच्या धावणमार्गावर यंत्राच्या साहाय्याने एक बाहुला पळविला जातो. त्याच्या मागून हे श्वान मोठ्या त्वेषाने धावतात. यावेळी त्यांना कोणतीही इजा होणार नाही याचीही काळजी श्वान मालक व आयोजकांकडून घेतली जाते. या स्पर्धेसाठी पंचवीस ते पन्नास हजारापर्यंतची बक्षिसे व चषक ठेवले जात आहेत.ही स्पर्धा आता प्रतिष्ठेची बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे किमती श्वान पाळण्याची पध्दत निर्माण झाली आहे. एकंदरीत या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आयोजकांची संख्याही वाढली आहे. (वार्ताहर)
ग्रामीण भागातील मातीतही रंगताहेत श्वानांच्या स्पर्धा
By admin | Published: January 10, 2016 11:10 PM