पलूस : पलूस येथील इंगळे पाझर तलावात सध्या देशी-विदेशी पक्ष्यांची शाळा भरली आहे. सकाळी गोडगुलाबी थंडीत शेकडो रंगीबेरंगी, देखणे पक्षी या तलावाची शोभा वाढवत आहेत. तलाव परिसराच्या जैवविविधतेत भर टाकत आहेत.
पक्षीप्रेमींसाठी जणू खजिनाच खुला झाला असून, पावले तलावाकडे वळत आहेत. पक्षी सप्ताहामध्ये निरीक्षणादरम्यान येथे ५० पेक्षा अधिक पक्षीप्रजाती पाहायला मिळाल्या. धान तीरचिमणी, तांबूस शेपटीचा चंडोल, तुतारी, पांढरा, पिवळा, करडा धोबी, कंठेरी चिखल्या, ठिपकेदार तुतवार, मलबारी मैना या पाहुण्या पक्ष्यांनी तलाव परिसरात तळ ठोकला आहे. पानकावळा, पांढऱ्या छातीचा धीवर, काळा शराटी, रॉबिन, गोरली, मोठा बगळा, पांढऱ्या मानेचा करकोचा, चमचे, रंगीत करकोचा, मोहोळघार, वटवट्या, ताम्रमुखी टिटवी, शेकाट्या, मध्यम बगळा, रिव्हर टर्न, बामणी मैना, हुदहुद्या, लाजरी पाणकोंबडी, कोतवाल, लालबुडी बुलबुल, भिंगरी, पारवा, खाटीक, कोकीळ, सुगरण, हळदीकुंकू बदक, लांब शेपटीचा सातभाई, अशा अगणित पक्ष्यांचा स्वैर संचार सुरू आहे.
स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांचे जणू संमेलनच भरले आहे. नाम्या वारकरी, माळ टिटवी या पक्ष्यांचे पहिल्यांदाच दर्शन झाले आहे. रंगीत करकोचा आणि युरेशियन चमचा या पक्ष्यांची संख्या यंदा लक्षणीय असल्याचे पक्षी अभ्यासक संदीप नाझरे यांनी सांगितले.
चांगल्या पावसाचा परिणाम
यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने पाणथळीच्या जागा टिकून राहिल्या आहेत. दलदल असल्याने पक्ष्यांसाठी किडे-कृमींचे खाद्य मुबलक प्रमाणात आहे. यामुळे पक्ष्यांनी गर्दी केल्याचे दिसत आहे.