सांगली : घरगुती गॅस सिलिंडर सहा महिन्यांत १४० रुपयांनी महागला आहे. प्रत्येक महिन्याला सरासरी तेवीस रुपयांची दरवाढ झाली आहे. गॅसचे अनुदान संपूर्णत: हटविण्याच्यादृष्टीने सरकारची वाटचाल सुरू असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
जानेवारीच्या सुरुवातीला १४.२ किलोचा सिलिंडर ६९९ रुपयांवर गेला. गॅसचे अनुदान प्र्रत्येक महिन्याला चार रुपयांनी कमी करण्यात येत आहे. ही दरवाढ ध्यानीमनी न येणारी ठरली आहे. जानेवारीत अनुदानापोटी प्रति सिलिंडर १५८ रुपयांचा भार सरकार सोसत होते. उज्वला योजनेतील ग्राहकांसाठी प्रति सिलिंडर १७९ रुपयांचे अनुदान मिळत होते.घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलिंडरची सोमवारची किंमत ६९९ रुपये होती. त्यातून १५८ रुपयांचे अनुदान बँक खात्यात जमा होते.
या हिशेबाने सिलिंडरची किंमत ५४१ रुपये होते. काही महिन्यांपासून गॅस कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळांवर गॅसचे दर प्रसिद्ध करणे बंद केले आहे. त्यातून ही दरवाढ लपविण्याचाच कंपन्यांचा हेतू दिसतो, अशी ग्राहकांची प्रतिक्रिया आहे. अनुदान बँकेत जमा होत असल्याने प्रत्येक महिन्यातील दरवाढ ग्राहकांच्या लक्षात येत नाही. त्यासाठी बँक ‘स्टेटमेन्ट’ पाहावे लागते. सामान्य कुटुंबे ते सहसा पाहत नाहीत. प्रत्येक महिन्याला दरवाढ करुन, येत्या तीन-चार वर्षांत संपूर्ण गॅस अनुदान काढून घेण्याच्या सरकारच्या हालचाली असल्याचे वितरकांनी सांगितले.
प्रत्येक घरगुती ग्राहकाला वर्षाकाठी बारा सिलिंडर अनुदानित किमतीत मिळतात. त्यापेक्षा जास्त सिलिंडरसाठी विनाअनुदानित सिलिंडरची बाजारभावानुसार किंमत मोजावी लागते.
- सिलिंडरच्या सहा महिन्यांतील किमती अशा : जुलै - ६२१ रुपये ५० पैसे, आॅगस्ट - ५५९.५०, सप्टेंबर - ५७५, आॅक्टोबर - ५८९.५०, नोव्हेंबर - ६६६, डिसेंबर - ६८०, जानेवारी - ६९९ रुपये. आॅगस्टमध्ये सर्वात किमान पातळीवर म्हणजे ५५९ रुपये किंमत होती, ती जानेवारीत ६९९ रुपये झाली. हा फरक १४० रुपयांचा आहे.
प्रत्येक महिन्याला दोन रुपयांचे अनुदान क मी करण्याच्या सरकारच्या सूचना होत्या. सध्या चार रुपयांनी अनुदान कमी केले जात आहे. अर्थात प्रत्येक महिन्याला किमान चार रुपयांची दरवाढ निश्चित आहे. अनुदान बँकेत जमा होत असल्याने, प्रत्येक महिन्याची दरवाढ ग्राहकांच्या ध्यानी येत नाही. घरगुती सिलिंडर सहा महिन्यांत महागला आहे.- अभयकुमार बरगाले,राज्याध्यक्ष, गॅस वितरक संघटना.------