लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासमोरील शिवाजी हाऊसिंग सोसायटीत असलेल्या ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाला पुनउभारणीसाठी मदतीचा ओघ सुरू आहे.
गेल्या पंधरा दिवसांत सुमारे ३५ हजार रुपयांची मदत रोख रक्कम व साहित्य स्वरूपात झाली आहे. मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अमृतराव सूर्यवंशी व त्यांचे मित्र नंदकुमार बाबर यांनी दहा हजार रुपये, निवृत्त रयत सेवक संघातर्फे अध्यक्ष एस.जी. शिंदे, सचिव देसाई, कार्यकारिणी सदस्य कोळी यांनी पाच हजार रुपये, तर उद्योजक पवन व चेतन शिंदे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ सुमारे १२ हजार रुपये किमतीचे फर्निचर वाचनालयाला भेट दिले आहे. वाचनालयाचे संस्थापक-सदस्य निवृत्त प्राचार्य डी. बी. पाटील, अध्यक्ष बी. व्ही. पाटील, उपाध्यक्ष डॉ. मोहन पाटील, खजिनदार विठ्ठल मोहिते, कार्यकारिणी सदस्य धोंडिराम पाटील यांनी या मदतीचा स्वीकार केला. मदतीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.