लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गोरगरीब ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी न तोडता त्यांना सोयीचे हप्ते करून द्यावेत, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने बुधवारी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे करण्यात आली.
भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, समितीचे निमंत्रक सतीश साखळकर, फारुक संगतरास यांनी शहर विभागाचे कार्यकारी अभियंता अशिष मेहता यांची भेट घेतली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून वीजबिल वसुलीसाठी महावितरण कर्मचारी थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे पुन्हा वीजजोडणी करण्यासाठी २४० रुपयांचे शुल्क भरावा लागतो. तितका भुर्दंड सामान्य ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे अशी तडकाफडकी कारवाई न करता थकबाकी वसुलीसाठी ग्राहकांना हप्ते पाडून द्यावेत, अशी मागणी पवार यांनी यावेळी केली. यावर मेहता म्हणाले की, याबाबत आम्ही सहकार्य करू, मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती त्यांनी तातडीने बिले भरावीत, अशा सूचना केल्या.