कोल्हापूर - सांगली आणि कोल्हापूरातील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. त्यामध्ये, स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह अनेकांनी मदतीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला संवेदनशील अभिनेता नाना पाटेकरही धावला आहे. नाना आज कोल्हापुरातील 5 गावांना भेटी देणार असून तेथे मदतकार्य करत आहे.
सांगली आणि कोल्हापूर येथे वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. मंगळवारी दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड येथे करण्यात आला. अखेर सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांसाठी 40 टन मदत साहित्य या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.
राज्यभरातून कोल्हापूर अन् सांगलीसाठी मदत मिळत आहे. प्रत्येकजण आपापल्यापरीने पुढे येत आहे. मराठी कलाकारांनंतर बिग बी अमिताभ यांनीही पूरग्रस्तांना मदतीचं आवाहन केलंय. तर, अजिंक्य रहाणे आणि सचिन तेंडुलकरनेही पूरग्रस्तांना मदत देत मदतीचं आवाहन केलंय. त्यानंतर आता अभिनेता आणि नाम या सामाजिक संस्थेचे प्रमुख नाना पाटेकर यांनी कोल्हापुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी, शिरोळमध्ये 500 घरं बांधून देणार असून त्यासाठी जागा निश्चित करत असल्याचे नानाने सांगितले. नाम फाऊंडेशनच्या कार्याप्रमाणेच पूरग्रस्तांनाही मदत करणार असल्याचं नानाने यावेळी म्हटले.
शिरोळच्या पद्मराज विद्यालयात नाना पाटेकर यांनी भेट देत तेथील पूरग्रस्तांना धीर दिला. पूरग्रस्तांचे अश्रू पुसताना काळजी करू नका, रडायचं नाही, सगळं ठीक होईल, असे नानाने म्हटले. तसेच, केवळ मी एकटाच नाही, सगळेजण मदत करत आहेत. मी, मकरंद्या किंवा कुणीही एकटा हे मदतकार्य करत नाही. सर्वचजण मदत करत आहेत, लोकं मदत देतात. एवढी मोठी आपत्ती आलीय, तात्काळ याच निवारण शक्य होणार नाही.
मी सर्वांचा अतिशय आभारी आहे, येथे सर्वचजण मदत करताना मला दिसत आहेत. इथं जेवण पाहिलं, किती चांगलं जेवण आहे, कुणी दिलंय हे?. आपणच सर्वांनी ही मदत केलीय, असे म्हणत सर्वांच्या मदतीनंच हे पुनर्वसन शक्य असल्याचे नानाने म्हटले आहे. तसेच, सरकारही त्यांचं काम करतंय, सरकार म्हणजे कोण रे... माणसंच आहेत ना, असे म्हणत सरकारही मदतकार्यात सोबत असल्याचे नानाने सूचवले आहे. दरम्यान, यावेळी नानाला पाहून अनेकजण भावुक झाले होते, तर कित्येकांना अश्रू अनावर झाले होते.