सांगली येथे निवासी जिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना राष्ट्रवादी पदवीधर संघटनेच्या विशाल सूर्यवंशी यांनी निवेदन दिले. यावेळी शुभम जाधव, अनिकेत भंडारे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे पालकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे चालू वर्षाचे परीक्षा अर्ज भरून घेताना मागील वर्षीच्या शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महाविद्यालयांना देऊन विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान टाळावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदवीधर संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विशाल सूर्यवंशी यांनी केली आहे.
या मागणीचे निवेदन सूर्यवंशी यांनी निवासी जिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना दिले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष शुभम जाधव, सांगलीचे शहराध्यक्ष अनिकेत भंडारे उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संसर्गामुळे मागील वर्षापासून शाळा, महाविद्यालये पूर्णपणे बंद आहेत. काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. अशावेळी महाविद्यालयातील सोयी-सुविधांचा लाभ घेतला नसतानाही यावर्षीच्या परीक्षेसाठीचे अर्ज भरून घेताना मागील वर्षीचे संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती केली जात आहे. हे शुल्क न भरल्यास परीक्षेचे अर्ज भरून घेतले जात नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयांना तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे.