सांगली : महापालिकेत आता नगरसेवक नसल्याने कोणाला घाबरण्याचे काम नाही. ठेकेदारांची साखळी मोडून दर्जेदार कामे करायला हवीत. अशी कामे करताना आता कोणत्याही खासदार, आमदारांकडून फोन आला तरी त्यांचे ऐकू नये, अशी सूचना खा. संजय पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिली.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मंगळवारी पाटील यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीस आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील, वैभव साबळे, राहुल रोकडे यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत पाटील यांनी महापालिकेच्या प्रतिमेवर बोट ठेवले. साखळी करून ठेकेदारांची खाबुगिरी फोफावल्याची टीका त्यांनी केली.
ते म्हणाले की, महापालिकेत आता प्रशासकराज आहे. त्यामुळे मुक्तपणे काम करण्याची संधी आहे. महापालिकेवर नागरिकांचा विश्वास उरला नाही. ही प्रतिमा बदलण्याची आता संधी आहे. त्यामुळे कोणाच्याही दबावाला बळी न पडता चांगली दर्जेदार कामे करण्यात यावीत. रस्ते, गटारी, ड्रेनेज यासह लोकांच्या हिताची कामे तातडीने करायला हवीत. ठेकेदारी व नगरसेवकांचा हस्तक्षेप थांबल्याने कमी खर्चात चांगली दर्जेदार कामे करता येणे शक्य आहे.
आयुक्तांनी ताकद दाखवावी
शहरातील मुख्य रस्ते, चाैक अतिक्रमणमुक्त करायला हवेत. आयुक्तांच्या हातीच आता अधिकार असल्याने त्यांनी त्यांची ताकद दाखवून शहराला शिस्त लावावी, असे खासदार पाटील म्हणाले.