सांगलीत शांतिनिकेतन लोकविद्यापीठात रणगाडा लोकार्पण सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, सनतकुमार आरवाडे, निवृत्त ब्रिगेडियर सुरेश पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक गौतम पाटील आदी उपस्थित होते.
छायाचित्र : सुरेंद्र दुपटे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मुलांना काहीच जमत नाही मिलिटरीत घालायचे, ही मानसिकता बदलायला हवी. महाराष्ट्रात एनडीए आहे. पण एनडीएमध्ये महाराष्ट्र कुठं आहे? याचा विचार करावा लागेल. मराठी मुलांनी सैन्याधिकारी होण्याची संधी साधली पाहिजे, असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडियर सुरेश पाटील यांनी केले. शांतिनिकेतन लोकविद्यापीठात रणगाडा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटील, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपत पाटील, निवृत्त ब्रिगेडियर सुरेश पाटील, संचालक गौतम पाटील आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, पालकांनी मुलांना हा रणगाडा दाखवायला हवा. शौर्यगाथाही सांगावी. त्याच्या प्रेरणेने मुले लष्करात जाऊन देशसेवा करतील. सुरेश पाटील यांनी रणगाड्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, १९७१ च्या भारत- पाकीस्तान युद्धात पश्चिम सीमेवर रणगाड्याने पराक्रम गाजवला होता. ३६ इन्फन्ट्री डिव्हिजनच्या प्रतापराव शिंदे यांच्या हॉर्स युनिटने ८ डिसेंबर १९७१ रोजी सक्करगढच्या बाजूने चढाई केली. १० डिसेंबर रोजी शत्रूचे आठ रणगाडे नष्ट केले. या युद्धात शिंदे हॉर्सला एक महावीर चक्र, दोन वीर चक्र, एक सेना मेडल आणि चार मेन्शन इन डिसपॅचेसनी सन्मानित केले होते. शांतीनिकेतनमध्ये रणसामग्रीचे स्मृतिस्थल तयार करण्याचा मानस आहे.
स्वागत संस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन महेश पाटील यांनी केले, तर आभार अशोक सावंत यांनी मानले. या वेळी सनतकुमार आरवाडे, विनया घोरपडे, ॲड. सतीश पाटील, उपसंचालक बी. आर. थोरात, डी. एस. माने, प्रशासकीय अधिकारी एम. के. आंबोळे आदी उपस्थित होते.
चौकट
पराक्रमी रणगाडा पाहण्याची संधी
हा टी-५५ बॅटल टॅंक रणगाडा १९६६ मध्ये सैन्यात दाखल झाला होता. निवृत्तीनंतर शांतिनिकेतनमध्ये सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ठेवला आहे. जरंडी (ता. तासगाव) येथील प्रतापराव शिंदे यांनी हा रणगाडा चालवला होता. रणगाडा सांगलीत आल्याचे समजले, तेव्हा त्यांनी मेरा साथी आ गया असे म्हणत गावभर साखर वाटली.