सांगली : पोलीस मुख्यालयाची नवी इमारत हॉकी मैदानावर उभी करु नये, अशी मागणी जयहिंद व्यायाम मंडळाने केली आहे. मंडळाने व हॉकी खेळाडूंनी यासंदर्भात पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील हॉकी खेळाडूंसाठी हे एकमेव मैदान आहे. हॉकीच्या प्रसारासाठी जयहिंद मंडळ ५० वर्षांपासून प्रयत्न करत आहे. या मैदानावर अनेक खेळाडूंनी सराव करुन राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवली आहेत. मंडळामार्फत दरवर्षी हॉकीच्या स्पर्धा भरवल्या जातात. महाराष्ट्र, कर्नाटकातून संघ सहभागी होतात. अत्यंत चुरशीने होणाऱ्या स्पर्धांमुळे हॉकी लोकप्रिय होत आहे. पोलिसांच्या हॉकी स्पर्धाही याच मैदानावर होतात. या स्थितीत या मैदानावर मुख्यालयाची इमारत उभारल्यास सरावाला ब्रेक लागेल. वार्षिक स्पर्धाही होणार नाहीत. नव्या खेळाडूंची अडचण होईल. त्यामुळे पोलीस मुख्यालयाच्या इमारतीसाठी पर्यायी जागेचा विचार व्हावा. मुख्यालयाच्या परिसरात अन्यत्र मुबलक जागा उपलब्ध असून, तेथे इमारत उभी करावी. त्यासाठी हॉकी मैदानाचा बळी देऊ नये.
मंडळाचे अध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार कुमार पाटील, सचिव राजेंद्र पाटील, संघटक अशोक लोंढे, सत्याप्पाण्णा कांबळे, दत्तात्रय कुलकर्णी, संजय देव, राजू चौगुले, नंदकुमार पाटील, गजानन राऊत, सुभाष काजवडेकर यांनी पालकमंत्र्यांना याविषयीचे निवेदन दिले.